पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र प्रदान
marathinews24.com
पुणे – गुन्ह्यांच्या तपासामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातील २२ पोलिस अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) देऊन गौरव करण्यात आला. सन २०२३ आणि २०२४ या वर्षांसाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांना राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा समारंभ शनिवारी (दि. ८) पुण्यातील पोलिस संशोधन केंद्रात संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील विकासकामांची केली पाहणी – सविस्तर बातमी
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून २०१८ पासून गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात येत होते. सध्या या पुरस्काराचा समावेश केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकामध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून २०२३ व २०२४ साठी एकूण २२ अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड झाली आहे. यामध्ये दोन पोलिस अधीक्षक, चार पोलिस उपाधीक्षक, नऊ पोलिस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि एका पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
पदक प्राप्त अधिकाऱ्यांनी खून, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, अपहरण, लैंगिक अत्याचार, बालकांचे अपहरण व अनैतिक व्यापार, सावकारीशी संबंधित गुन्हे, सायबर गुन्हे आणि क्रिप्टोकरन्सी फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास केला. पारंपरिक तपास पद्धतींसोबतच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, डम्प डाटा, डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए प्रोफाइलिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांच्या तपासातील काही प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली. एका प्रकरणात तपासातून ५५ कोटी १२ लाख रुपयांहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणत सुमारे ४० हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तसेच एका गंभीर हत्याकांडात सीसीटीव्ही, सायबर विश्लेषण, डीएनए, फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले.
सायबर गुन्ह्यांच्या तपासातही अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. एका क्रिप्टोकरन्सी प्रकरणात डिजिटल वॉलेटच्या फॉरेन्सिक विश्लेषणातून सुमारे सहा कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली. तर एका खंडणीसाठी अपहरण झालेल्या बालकाची तांत्रिक तपासाच्या आधारे ७४ तासांच्या आत सुटका करण्यात आली.
बालकांच्या अपहरण व अनैतिक व्यापाराशी संबंधित प्रकरणांमध्येही तपास अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक पीडित बालकांचा शोध घेतला. एका प्रकरणात अवघ्या २४ तासांत अपहरण झालेल्या बालकाची सुटका करण्यात आली. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी १४ बालकांचा शोध घेऊन त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
जळगावमधील बँक दरोड्याच्या प्रकरणात सुमारे ३ कोटी ८० लाख रुपयांचे सोने व इतर मुद्देमाल लुटण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यावर संशय घेत त्याच्या नातेवाइकाच्या रायगड येथील घरातून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणून अवघ्या ८१ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
मुंबईतील एका गंभीर खून प्रकरणात सीडीआर, सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. तसेच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींच्या गुन्हेगारी टोळ्या उघडकीस आणून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये तपास अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पीडितांचे पुनर्वसनही शक्य झाले.
महाराष्ट्र पोलिस दलातून या पदकांसाठी अधिकाऱ्यांची शिफारस करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष समिती कार्यरत आहे. प्राप्त शिफारशींची निकषांनुसार छाननी करून केंद्र सरकारकडे अहवाल पाठविला जातो. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पात्र अधिकाऱ्यांची अंतिम निवड केली जाते.
समारंभात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी पदक प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उत्कृष्ट तपास कार्याचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक तपास आणि न्यायालयात पुरावे टिकवून ठेवण्याची क्षमता ही आजच्या तपास यंत्रणेची महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी पुणे शहर पोलिस दलाचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सुनील फुलारी, दीपक पाण्डेय, सुहास वारके, सुधीर हिरेमठ, श्रीकांत पाठक, अमोघ गावकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, पदक विजेते अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त अधिकारी..
१) गिरीश रमेश सोनवणे, पोलिस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग
२) राहुल रावसाहेब धस, सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई
३) अभिजीत सुरेश शिवथरे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड
४) हेमंत विजय बेंडाळे, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई
५) नितीन केशवराव जाधव, सहायक पोलिस आयुक्त, फोर्स वन, मुंबई
६) संदीप बाबुराव मिटके, सहायक पोलिस आयुक्त, नाशिक
७) शेखर रामदास बागडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे
८) उत्कर्ष अशोक वझे, पोलिस निरीक्षक, मुंबई
९) अंकुश भालचंद्र चिंतामण, पोलिस निरीक्षक, नाशिक
१०) विजयसिंह रामचंद्र भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
११) ज्योत्सना विलास रासम, सहायक पोलिस आयुक्त, मुंबई
१२) शंकर विठ्ठल शेळके, पोलिस उपाधीक्षक, वाशिम
१३) रेखा सागर संकपाल, सहायक पोलिस निरीक्षक, संभाजीनगर
१४) सिद्धेश दिलीप जोष्टे, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई
१५) राधिका गिरधर भावसार, सहायक पोलिस निरीक्षक, परभणी
१६) समीर प्रकाश लोणकर, पोलिस निरीक्षक, मुंबई
१७) दिनेश त्र्यंबक लबडे, पोलिस निरीक्षक, चंद्रपूर
१८) पंकज विनय चक्रे, पोलिस निरीक्षक, नागपूर ग्रामीण
१९) मनोज श्रीराम चौधरी, पोलिस निरीक्षक, नागपूर
२०) विवेकानंद बलभीम पाटील, पोलिस निरीक्षक, लातूर
२१) उमेश बाबाराव बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक, नाशिक
२२) कृषिकेश प्रदीप रावले, पोलिस उपायुक्त,






















