‘सीबीआय अधिकारी’ असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – शहरातील ज्येष्ठ नागरिकाला तुमचे बँक खाते गुन्ह्यात पैसे घेण्यासाठी वापरण्यात आले असून, याबाबत तुम्हाला अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी म्हणून तब्बल १० कोटी ७४ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या रिलस्टार मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठाला धमकावले होते. रोहन रामेश्वर जाधव (वय २६, रा. सूर्य अपार्टमेंट, गजानननगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल आहे.
कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय – सविस्तर बातमी
आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात यापुर्वी हर्षद सुभाष धनतोले (वय २६, रा. कर्वेनगर), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, रा ) अमर अत्तरगी (वय २४) प्रणव करणसिंग आर्या (वय ३१, रा दिल्ली) यांना अटक केली आहे. रोहन जाधव हा मुळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्याचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. तो पिंपळे गुरव भागात राहण्यास असून, रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. रोहन जाधव सोबतच त्याच्या टोळीने जवळपास २९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ते ३१ जानेवारी २०२६ कालावधीत आरोपींनी ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा वापर करून त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले. खात्याचा वापर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आढळून आला. संबंधित खात्यावर तब्बल २४ जणांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
टोळीने ‘तुम्हाला अटक होणार आहे, तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही अटक होऊ शकते’, अशी भीती दाखवली. तसेच, गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग करण्यास सांगितले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ही फसवणूक केली. त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरून घेण्यात आले आणि एकूण १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
७५ लाखांवरून आरोपी जाळ्यात तांत्रिक तपासादरम्यान फसवणुकीच्या रकमेपैकी ३० जानेवारी रोजी एका बँक खात्यात ७५ लाख रुपये भरल्याचे समोर आले. नंतर त्या खात्यातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ६ लाख ५० हजार रुपये वर्ग करण्यात आले होते. सायबर क्राइम पोर्टलवरून मिळालेली माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
बँक व्यवहारांतून पोलिसांनी गाठले आरोपीला फरार आरोपी रोहन जाधवचा शोध घेताना पोलिसांनी त्याचे विविध बँक व्यवहार, आर्थिक देवाण-घेवाण तसेच टोळीतील इतर आरोपींशी असलेले संबंध तपासले. या तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे रोहन जाधव याला पिंपळे गुरव येथून ताब्यात घेण्यात आले. ५ हजार ४३६ खात्यांत पैसे वर्ग
या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच तब्बल ५,४३६ बँक खात्यांमध्ये तक्रारदारांच्या पैशांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर पसरलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘सीबीआय अधिकारी’ म्हणत धमकी दिल्यास सावध राहा. नागरिकांनी स्वतःला सीबीआय, ईडी, पोलिस किंवा अन्य शासकीय संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल, फोन कॉल किंवा संदेशाद्वारे धमकावून पैशांची मागणी केल्यास पैसे देऊ नयेत. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.























