ध्वनिक्षेपक, मिरवणूक, सभा आणि पक्ष कार्यालयांबाबत नियम लागू
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pimpri Chinchwad Election Restrictions) निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ मधील कलम १६३ अन्वये ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
पद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुक – सविस्तर बातमी
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, शासकीय कार्यालये व विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे किंवा उपोषण करणे तसेच घोषणाबाजी, वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
Pimpri Chinchwad Election Restrictions तसेच निवडणूक कालावधीत प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनाच्या छतामध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री अथवा उच्चपदस्थ व्यक्तींच्या ताफ्यासंदर्भातील लागू आदेश मात्र कायम राहतील. शासकीय कामासाठी असलेल्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीत कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. फिरत्या वाहनावरून ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारे ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
तसेच सर्व धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये शिक्षेस पात्र कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.






















