स्वच्छता, रक्तदान, आरोग्य तपासणी, महिला शेतकरी सन्मान व चित्रकला स्पर्धेतून सामाजिक बांधिलकी
marathinews24.com
बारामती – समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचविणे, स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे तसेच सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणे या उद्देशाने दि. १७ सप्टेंबर पासून १७ ऑक्टोबर पर्यंत इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ (Seva Sankalp Abhiyan Indapur) राबविण्यात येत आहे. इंदापूर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच शेतकरी यांचा सहभाग वाढवून सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात येत आहे. कांदलगाव येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ व सुंदर परिसराचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मानकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय व सार्वजनिक ठिकाणांविषयी जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Seva Sankalp Abhiyan Indapur निंबोडी येथे रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण कार्य असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचे आवाहन शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. डिकसळ येथे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा व आरोग्यविषयक जनजागृती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
पिटकेश्वर येथे महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. याचबरोबर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.
गोखळी येथे जिल्हा परिषद शाळा तसेच मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सार्वजनिक व धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करत नागरिकांनीही स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला. Seva Sankalp Abhiyan Indapur या सर्व उपक्रमांमधून स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग या विविध बाबींवर भर देण्यात आला. गावपातळीवर नागरिकांचा सहभाग वाढवून विकासकामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे.
इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून विविध गावांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारे ठरत असून, ‘सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेला बळ मिळत आहे.






















