नियम उल्लंघनप्रकरणी २१ गुन्हे दाखल
पुणे- शहरातील उपनगरांत रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या ७७ हाॅटेल, पबविरुद्ध पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. तर आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ पब आणि बारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणाला सोमवारी (१९ मे) वर्ष पूर्ण होत असताना, पुण्यातील उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी हाॅटेल, रेस्टॉरंट आणि पबमधील गोंधळ, गैरप्रकार उजेडात आला होता.
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दापाश – सविस्तर बातमी
येरवाड्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी १९ मे च्या पहाटे दुचाकीस्वार संगणक अभियंता अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा भरधाव मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. हा मुलगा मुंढव्यातील एका पबमध्ये मित्राबरोबर पार्टी करून कल्याणीनगर भागातून निघाला होता. परदेशी बनावटीची महागडी मोटार हा मुलगा चालवत असल्याचे तपासात उघडकीस आले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरात पहाटेपर्यंत पब, बार, रेस्टॉरंट सुरू असल्याचे उघडकीस आले होते. पबमधील गैरप्रकार, गोंधळाचा त्रास या भागातील रहिवाशांना होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बार, रेस्टॉरंट, पब, हाॅटेल चालकांविरुद्ध नियमावली तयार केली. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या पब, हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट चालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. सुरुवातीला या नियमावलीचे पालन करण्यात आले. त्यानंतर शहरातील काही पब, हाॅटेल, रेस्टॉरंट, बारचालक नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
पोलिसांकडून ७७ हाॅटेल, पबवर वर्षभरात कारवाई
पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या ७७ हाॅटेल, पबवर वर्षभरात कारवाई केली. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी १६ पब, रेस्टॉरंट, बारविरुद्ध, तर नियम धुडकाविणाऱ्या २१ पब आणि बारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
परवाना नसताना ‘रुफटाॅप’वर मद्यविक्री
नियमांचा भंग केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात ४०५ बार, रेस्टाॅरंटविरुद्ध कारवाई केली आहे. उपनगरातील उंच इमारतींतील रुफटाॅप हाॅटेलांमध्ये नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. उत्पादनशुल्क विभागाकडून २९ रुफटाॅप हाॅटेलविरुद्ध कारवाई करण्यात आली, तसेच नियमभंग केल्याप्रकरणी ७७ बारचे परवाने निलंबित केले.