सायबर चोरट्यांकडून १२ लाख ७० हजारांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – ट्रेडींग स्टॉकच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी एका ७५ वर्षीय नागरिकाला अकाउंट तयार करायला भाग पाडले. त्यानंतर त्यांना काही रकमेचा परतावा देउन विश्वास संपादित केला. त्यानुसार सायबर चोरट्यांनी जेष्ठाला गुंतवणूकीवर नफ्याच्या जाळ्यात अडकवून तब्बल १२ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ एप्रिलला घडली असून, रमेश जकातदार (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलिसांनी १९ एप्रिलला अज्ञात सायबर चोरट्यांविरूद्धगुन्हा दाखल केला आहे.
कारचालकाच्या धडकेत ज्येष्ठ दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जकातदार हे कुटूंबियासह सिंहगड रस्ता परिसरातील जाधवनगरात राहायला आहेत. १५ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांना मेसेजद्वारे संपर्क साधला. ट्रेडींग स्टॉकच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगितले. त्याबदल्यात काही रक्कम सायबर चोरट्यांनी जकातदार यांच्या बँकखात्यात वर्ग करीत विश्वास संपादित केला. त्यामुळे त्यांनी गुंतवणूकीला सुरूवात केली. जवळपास १२ लाख ७० हजारांवर त्यांनी रक्कम जमा केली होती. त्यानंतर मात्र सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क बंद केला. जकातदार यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, तो बंद असल्याचे स्षष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करीत आहेत.
३ घटनेत सायबर चोरट्यांनी केली ५६ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूकीचे सत्र कायम असून सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत तिघांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी मगरपट्टा सिटी भागातील एकाची ४५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कात्रज भागातील एकाची चोरट्यांनी ६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत. अशाच पद्धतीने चोरट्यांनी धनकवडी भागातील तरुणाची ६ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक केली. सहकारनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड तपास करत आहेत.