शेतकऱ्यांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करावा
marathinews24.com
पुणे – आंबिया बहार सन २०२६ (Ambiya Bahar Crop Insurance 2026) अंतर्गत फळपिकांसाठी हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे, यासाठी पीक विमा योजनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केळी पिकासाठी विविध हवामान धोक्यांनुसार विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
या योजनेत केळी पिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, पावसाचा खंड आणि गारपीट या हवामान धोक्यांचा समावेश आहे. कमी तापमानासाठी १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी, वेगाच्या वाऱ्यासाठी १ मार्च ते ३१ जुलै, जादा तापमानासाठी १ एप्रिल ते ३१ मे, तर पावसाच्या खंडासाठी १५ जुलै ते १५ सप्टेंबर हा विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
गारपिटीसाठी १ डिसेंबर ते ३१ मे या कालावधीत संरक्षण देण्यात येणार आहे. केळी पिकासाठी पहिल्या चार हवामान धोक्यांकरिता विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर १ लाख ७० हजार रुपये असून, शेतकऱ्यांचा विमा हप्ता ८,५०० रुपये आहे. गारपिटीसाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर ५७ हजार रुपये असून, विमा हप्ता २,८५० रुपये आहे.
विमा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड,पी बँक खात्याचा तपशील आणि जमीनधारणा उतारा असणे आवश्यक आहे. तसेच जिओ टॅग फोटो आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत १०० टक्के पिकाची नोंद बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती घेऊन विहित मुदतीत नजीकच्या ई-सेवा केंद्रात किंवा बँक व वित्तीय संस्थेत संपर्क साधून विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांविषयी सविस्तर माहिती कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पीक विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरु असल्याचे हाके यांनी कळविले आहे.























