शाळेत शिवाजी जोगदंड यांची नियुक्ती
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – मुख्यमंत्री साहेब आम्ही मेहनत घेतो, तुम्ही फक्त शिकवण्यासाठी शिक्षक द्या, आम्हाला शिकायचे आहे, मोठे अधिकारी व्हायचे आहे, असे म्हणत हातात बाटली घेऊन स्वतः रिपोर्टिंग करत विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील अडचणी मांडत शाळेतील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्त हाक दिली होती. बीड जिल्ह्यातील (Beed News) हिवरा पहाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची एक दिवसापूर्वी बातमी विविध मिडियाने प्रसारीत केली होती. याची दखल राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्हाच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतली आहे.
Beed News विद्यार्थिनींच्या मागणीला प्रशासनाने तातडीचा प्रतिसाद दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी (केंद्र जरूड), ता. बीड येथील चिमुकल्या विद्यार्थिनींनी पाण्याच्या बाटलीचा माईक तयार करून आपल्या शाळेतून अभिरूप बातमीपत्र सादर करत गणित, विज्ञान आणि संगणक विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेतून ‘बॉटल माईक’च्या माध्यमातून ही बाब सोशल माध्यमांवर मांडली होती.
याच व्हिडीओची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने दखल घेतली. विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेत बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने हिवरा पहाडी जिल्हा परिषद शाळेसाठी शिक्षक उपलब्द करून देण्याचे निर्देश देण्यात आले.त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने निर्देशाचे पालन करून हिवरा पहाडी जिल्हा परिषद शाळेसाठी शिक्षक शिवाजी जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली.
जोगदंड हे हिवरा पहाडी येथील शाळेत रुजू झाले आहेत.विद्यार्थिनींच्या कल्पकतेतून केलेल्या मागणीची प्रशासनाने आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल शाळेतील विद्यार्थिनींनी आणि सर्व शिक्षकवृंद ,सर्व शिक्षणप्रेमी नागरीकांनी आभार मानले आहे.























