बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलाचा चाप ओढल्याने दुर्घटना
marathinews24.com
पुणे – Bibwewadi Firing Case : अल्पवयीनाने बेकायदा बाळगलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार झाल्याने तरुण जखमी झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरातील आईमाता मंदिर रस्त्यावर घडली. बेकायदा पिस्तूल बाळगून तरुणाला जखमी केल्या प्रकरणी एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यात डंपर, कंटेनर चालक सुसाट – सविस्तर बातमी
Bibwewadi Firing Case : विजय भास्कर पाटील (वय २५, रा. टेल्को काॅलनी, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार शिवानंद बोले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेला १७ वर्षीय अल्पवयीन हा गुलटेकडी परिसरातील एका वसाहतीत राहायला आहे. अल्पवयीन आणि पाटील हे मित्र आहेत. अल्पवयीनाने बेकायदा पिस्तूल बाळगले होते. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील आईमाता मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत अल्पवयीन आणि पाटील थांबले होते. त्या वेळी अल्पवयीनाने बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल त्याने पाटील याला दाखविले. पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेला आणि गाेळीबार झाला. गोळी सुटल्याने पाटील जखमी झाला. पाटील याच्या पार्श्वभागाजवळ गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी झाला.
घाबरलेल्या अल्पवयीनाने पाटील याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पाटील याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तेव्हा तो गोळीबारात जखमी झाल्याचे उघडकीस आला. खासगी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी या घटनेची गांभीर्य विचारात घेऊन त्वरीत पोलिसांना माहिती मिळाली. पाटील याच्यावर उपचार सुरू आहेत. अल्पवयीन आणि पाटील यांची पार्श्वभूमी पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. अल्पवयीनााने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने पिस्तूल कुणाकडून आणले? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक निवास शिंदे यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.























