लाच प्रकरणात ‘सीबीआय’कडून कारवाई
marathinews24.com
पुणे – ठेकेदारांना मिळालेल्या १ कोटी २२ लाख रुपयांच्या कामापोटी मध्यस्थांमार्फत तीन ठेकेदारांकडून लाच स्विकारल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय-एसीबी युनिट) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील रक्षा लेखा विभागातील सहायक लेखापरीक्षक, मध्यस्थ, ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या – सविस्तर बातमी
दक्षिण मुख्यालयाच्या रक्षा लेखा विभागातील सहायक लेखा अधिकारी सुभाष कुमार, लेखापरीक्षक उर्वशी कुमावत, मध्यस्थ आदिनाथ दत्तात्रय पोपळकर (रा. बाणेगाव, जि. सोलापूर), तसेच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त संरक्षण लेखा नियंत्रक मणी वेलन के यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाकडून नाशिक, तसेच पुण्यातील फुरसुुंगी, मांजरी परिसरातील तीन कंपन्यांना १ कोटी २२ लाख रुपयांचे काम देण्यात आले होते. मध्यस्थ आदिनाथ पोळेकर यांनी ठेकेदार कंपन्यांकडून लाचेची रक्कम गोळा करुन रक्षा लेखा विभागातील (डिफेन्स अकाऊंट) सहायक लेखा अधिकारी सुभाष कुमार, लेखापरीक्षक उर्वशी कुमावत यांना लाचेची रक्कम दिली होती. पोपळकरने कुमार आणि कुमावत यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली होती. आर्थिक फायद्यासाठी ही रक्कम त्यांनी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर शहानिशा करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयचे पोलीस निरीक्षक प्रदीप देवकर तपास करत आहेत.





















