पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे पोलिसांचे आवाहन
marathinews24.com
सातारा – महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025 हा जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विकास महामंडळामार्फत महाबळेश्वर येथे आयोजि केला आहे. २ ते ४ मे कालावधीत महोत्सव कालावधीत महाबळेश्वरहद्दीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून महोत्सवास महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. व्ही. व्ही. आयपी व व्हीआयपी हे सुध्दा पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
शाब्बास पुणे ग्रामीण पोलीस; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून कौतुक – सविस्तर बातमी
महाबळेश्वर-पांचगणी रोड अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.. महोत्सव कालावधीत वाई बाजुकडुन पांचगणी-महाबळेश्वरकडे जाणा-या व महाबळेश्वर पाचगणी बाजूकडुन वाई-सातारा बाजूकडे जाणा-या नागरीकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणुन २ ते ४ मे कालावधीत डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा तथा, प्रभारी पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता अधिसुचना पारित केली आहे.
वाहतुक मार्गातील बदल खालीलप्रमाणे
मुंबई- पुणे- वाई बाजूकडुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही वाई (पसरणी घाट) मार्गे पांचगणी व महाबळेश्वरकडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील. महाबळेश्वर वरून मुंबई- पुणे-वाई बाजूकडे जाणारी सर्वप्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर-मेढा-कुडाळ-पाचवड वरुन पुणे बैंगलौर महामार्गाकडे जाईल.
महाबळेश्वरवरून भिलार-पाचगणी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही महाबळेश्वर उदय हॉटेल चौक- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका मार्गे – अवकाळी अशी जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
महाबळेश्वर वरुन वेण्णा लेककरीता जाणारी वाहतुक ही महाबळेश्वर मार्केट- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका –नाकिंदा फाटा मार्गे वेण्णालेककडे जाईल. या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
महाबळेश्वर वरून सातारा, सांगली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर मेढा- सातारामार्गे पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे जाईल.
वाहतूक बदलाबाबत ठिकाणी दिशा दर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.