गांजा, बंदी घातलेले हुक्का फ्लेव्हर्स, लाखोंचा मद्यसाठा जप्त
marathinews24.com
पुणे – शहराजवळ असलेल्या तुळापूर परिसरातील आलिशान रिसॉर्टमध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’ या नावाखाली पहाटेपर्यंत सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धडक छापा टाकत पार्टी उधळून लावली. मद्याच्या नशेत बेभान झालेले तरुण तरुणी, कानठळ्या बसविणारे संगीत, प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स, गांजाचा वापर आणि परवान्याची मुदत संपल्यानंतरही सुरू असलेला धिंगाणा यामुळे या कारवाईने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सात आयोजकांसह 78 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
या प्रकरणात प्रोजेक्ट एक्स हाऊस नावाने तुळापुर येथील फार्महाऊसवर रेव्ह पार्टीचे आयोजन करणारे यश राजा चौधरी (26, देवलिंग सोसायटी, गावडे पेट्रोल पंपाजवळ, चिंचवड), एैमनं सैफ शेख (27, सिटी टॉवर्स, कौसरबाग, कोंढवा) यांच्यासह सैफ आसिफ सय्यद, सिध्दांत संतोष धुवाडी, दिशांत संतोष धुवाडी, अली रौफ पानसरे, आवेश समशुलहक अन्सारी यांच्यासह 78 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांमध्ये 14 बांउंसर, कर्कश्य आवाजात 5 डीजे चालक गाणी वाजविणारे, विद्युत रोषणाई करणारे दोघे, पार्टीत सहभागी होऊन मद्याचे व अमली पदार्थाचे सेवन करणारे 22 जण, अवैधरित्या पार्टीकरिता बंगला देणारा आरोपी नरेंद्र सुंदरलाल चुघ, तसेच बार टेंडर, सेफ, हाऊस किपींग, इतर कामकरणारे असे 14 जणांवर भारतीय न्यायसंहिता कलम 223, 270, 292, 3 (5), महाराष्ट्र दारूबंदी अधिनिय 65 (ई), 68, 77, 78, 82, 83, 84, 86, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 33, आर डब्ब्ल्यु 131, एनडीपीएस ॲक्ट 20(ब), कोटप्पा ॲक्ट 3, 4 तेसेच जे. जे. ॲक्ट 75, 79 नुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर येथे फार्महाऊसवर अनधिकृत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार दि. ७ जून (रविवार) रोजी पहाटे अडीच वाजता १५ अधिकारी आणि ६५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित रिसॉर्टवर छापा टाकला. पोलिस अचानक दाखल होताच पार्टीत एकच गोंधळ उडाला. अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपस्थितांपैकी 25 वर्षांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अल्पवयीनांना पार्टीत प्रवेश कसा देण्यात आला, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपासात मद्यसेवनासाठी घेण्यात आलेला परवाना दि. ६ जून रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंतच वैध होता. मात्र परवान्याची मुदत संपल्यानंतरही पहाटेपर्यंत पार्टी सुरू होती. यामुळे परवान्याच्या अटींचे सर्रास उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमके मद्य कोणी पुरवले. पार्टीची वेळ कशी वाढली याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी ३ ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच तीन कपपॉटमध्ये ठेवलेले १० प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्सही जप्त करण्यात आले. पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाला होता का, याचा तपास करण्यासाठी उपस्थितांची वैद्यकीय तपासणी तसेच तांत्रिक पुराव्यांची छाननी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान तब्बल ९ लाख २२ हजार रुपयांचा मद्यसाठाही जप्त करण्यात आला. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. मद्यसाठा, हुक्का साहित्य, ध्वनी यंत्रणा आणि अन्य साहित्य असा एकूण सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तुळापूरमधील कारवाईमुळे पुण्याच्या उपनगरांत सुरू असलेल्या रेव्ह पार्टी, अमली पदार्थांचा वाढता वापर आणि बेकायदेशीर नाईटलाइफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षांत शहर आणि उपनगरांत अशा प्रकारच्या कारवाया झाल्या असल्या, तरी अशा पार्ट्यांचे सत्र कायम असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे या मागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
उपस्थित होणारे प्रश्न
– परवान्याची मुदत संपल्यानंतरही पार्टी पहाटेपर्यंत कशी सुरू राहिली
– सकाळी १५६ जण पार्टी सहभागी असलेला अकडा 78 वर कसा आला
– लाखोंचा मद्यसाठा नेमका कुठून आणला गेला
– गांजा आणि प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स पार्टीपर्यंत पोहोचले कसे
– अल्पवयीनांना दिला होता का असेल तर किती अल्पवयीन पार्टीत हाेते
– अशा पार्ट्यांच्या मागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत आहे का
– सोशल मीडियाद्वारे चालणाऱ्या गुप्त निमंत्रणांवर नियंत्रण कसे आणणार
– पुण्याच्या उपनगरांत आणखी किती ‘प्रोजेक्ट एक्स’ सुरू आहेत
– स्थानिक पोलिस उत्पादन शुक्ल विभागाचा काही बेकायदेशीर सहभाग होता का
– यापूर्वी अशा किती लेट नाईट पार्ट्या या ठिकाणी झाल्या
– कंपन्यांच्या ऑर्गनायझर्स या व्यतीरिक्त पुण्यात लेटनाईट कुठे पार्ट्या आयोजीत करतात
– गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एकही तरूणीचे/ महिलेचे नाव नाही






















