गुन्हे शाखेतील समन्वयामुळे मोठे गुन्हे उलगडले – शैलेश बलकवडे
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेसह विविध गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखेत अधिकारी-कर्मचार्यांमध्ये असलेले टीमवर्क खूप कामी आले. त्यामुळचे आव्हानात्मक असलेल्या बोपदेव घाटातील तरूणावरील सामूहिक अत्याचार प्रकरणाचा छडा लागणे, आंतरराष्ट्रीय मेफेड्रॉन तस्करीचे रॅकेट उध्वस्त करणे, पोर्शे अपघातासह अनेक गंभीर गुन्ह्यात गुन्हे शाखेचे समन्वय फायदेशीर ठरले आहे. त्याचा फायदा नागरिकांसह आम्हालाही झाल्याची प्रतिक्रया गुन्हे शाखेचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी (दि. १९) गुन्हे शाखेचा पदभार अपर आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सुर्पूद केला.
अपर आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले, पुणे शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचा अपर पोलीस आयुक्त म्हणून जवळपास सव्वा वर्षे पदभार सांभाळला. दरम्यानच्या काळात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास करताना आम्ही अधिकारी- कर्मचार्यांनी एकजीवाने काम केले. त्यामुळेच आव्हानात्मक ठरलेल्या बोपदेव घाटातील तरूणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींचा अटकाव करण्यास मदत झाली. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही आरोपींच्या मुसक्या आवळताना आमच्यातील समन्वय खूपच मोलाचा ठरला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यांची उकल केली आहे. उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, एसीपी गणेश इंगळे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी, विविध पथकांचे अधिकारी कर्मचार्यांसोबत काम करताना आनंद झाला.
पुणेकर अन पत्रकार मित्र जीवनभर लक्षात राहतील
पुण्यात काम करताना अनेकवेळा चांगल्या कामाचे पुणेकरांनी कौतुक केले होते. त्यासोबत रेंगाळलेल्या काही गुन्ह्याच्या तपासाबाबत टीकाही केली होती. मात्र, आम्ही प्रत्येकवेळी जोमाने काम केल्यामुळे गुन्हेगारांसह सराईत टोळ्यांमध्ये सततची भीती होती. दरम्यान, पुण्यातील पत्रकारांचे विशेष कौतुक आहे. इथले बहुतांश प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन वेबपोर्टलचे पत्रकार मित्र खूपच संवेदनशील अन समजूतदार आहेत. त्यांच्यासोबत असलेले माझा सुसंवाद जीवनभर लक्षात राहणार आहे. पुणेकर आणि पत्रकार मित्र कायमस्वरूपी लक्षात राहतील, अशीही प्रतिक्रिया शैलेश बलकवडे यांनी दिली.