कुख्यात गँगस्टर निलेश घायवळने दिला होता भावाला सल्ला
marathinews24.com
पुणे – पोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहा, असा सल्ला कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याने मोठा भाऊ गुंड सचिन घायवळ याला दिला होता. त्यानुसार तब्बल नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत सचिनने सोलापूर, जामखेड राजस्थानमध्ये आश्रय घेतला. मात्र, पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावातून त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर फरार असलेल्या गँगस्टर नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (४८, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) याच्यावर खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ४४ लाख ३६ हजार रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यानंतर तो पुण्यातून फरार झाला होता. गुंड सचिनने सुरुवातीला सोलापूरमध्ये भाड्याच्या घरात आश्रय घेतला. पोलिस आपला माग काढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने तेथूनही काढता पाय घेत जयपूरमार्गे राजस्थान गाठले. सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावात तो १० फेब्रुवारीपासून राहत होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने दाढी वाढवून आपला पेहराव आणि राहणीमानही बदलले होते.
फरारी काळात पोलिसांचे तांत्रिक जाळे चुकविण्यासाठी सचिनने राजस्थानमध्ये वास्तव्यास असताना तीन वेगवेगळे मोबाईल वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मोबाईल क्रमांक वारंवार बदलणे, मर्यादित संपर्क ठेवणे आणि सोशल मीडियापासून दूर राहणे, अशा पद्धतीने तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र, गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. सचिन घायवळ याने पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान फरार भाऊ निलेशबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. नीलेश घायवळच्या गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असून, त्याचा फटका आपल्या मुलांनाही बसल्याची खंत सचिनने व्यक्त केली आहे.
चौकशीदरम्यान सचिनने पोलिसांना सांगितले की, नीलेशने स्वतःच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले, त्यांचे भविष्य सुरक्षित केले. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे आमच्या कुटुंबीयांवर आणि मुलांवर वाईट वेळ आल्याचे त्याने कोठडी दरम्यान बोलून दाखविले. पोलिसांच्या माहितीनुसार, फरारी काळातही सचिन आणि नीलेश यांच्यात संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. निलेश घायवळला लुकआऊट नोटीस काढून तो अजून भारतात परतला नाही.






















