सोनसाखळी आणि मोबाइलसह १ लाख ४६ हजारांचा ऐवज लंपास
marathinews24.com
पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाला मारहाण करुन गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल संच असा एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात (Ganesh Visarjan Crime) आल्याची घटना बेलबाग चौकात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विसर्जन मिरवणुकीत १ हजार २२४ मंडळांचे ध्वनी रीडिंग, कारवाईला सुरूवात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वडगाव शेरी परिसरात राहायला आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तरुण मित्रासोबत लक्ष्मी रस्ता परिसरात आला होता. २५ सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास बेलबाग चौक परिसरात गर्दीत चौघांनी त्याला अडवले. त्याला कटरने वार करण्याची धमकी दिली. तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल संच असा मुद्देमाल हिसकावून घेतला. गर्दीत तरुणाचा आरडाओरडा ऐकू आला नाही. तरुणाला मारहाण करुन चोरटे गर्दीत पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.
मिरवणुकीत दागिने चोरीचे १९ गुन्हे
Ganesh Visarjan Crime विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी उच्छाद मांडला. वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. मध्य भागताील फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत १४ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गर्दीत चोरट्यांनी नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविले. दागिने चोरीच्या घटना बेलबाग चौक परिसर, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता परिसरात घडल्या. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मध्य भागातील केळकर रस्ता, बेलबाग चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.























