मोबाईल शॉपी मालकावर केला होता कोयता हल्ला
marathinews24.com
पुणे – मोबाईल शॉपी मालकावर हल्ला करणाऱ्या घायवळ टोळीतील गुंड प्रशांत धुमाळ (रा. दत्तवाडी) याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. प्रशांत धुमाळ हा नीलेश घायवळ याच्या टोळीतील गुंड असून यापूर्वी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. प्रशांत धुमाळ व त्याचे साथीदार हे हल्ला केल्यानंतर फरार झाले होते. घटनेत अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांचे कर्वे रोडवर स्मार्ट कॅफे मोबाईल शॉपी आहे. या मोबाईल शॉपीमधून बनावट कागदपत्राच्या आधारे सीम कार्ड घेऊन त्याचा उपयोग हा गुन्हे कारवायांसाठी केल्यानंतर अमित शिंदे यांनी नीलेश घायवळ याच्याविरोधात गेल्या वर्षी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
दारू निर्मितीचे ३ हजार ४२० किलो ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त – सविस्तर बातमी
गुंड नीलेश घायवळची टोळी त्याच्यावर राग धरून होती. तसेच त्याचे आणि पत्नीचे पटत नसल्याने ते वेगळे राहतात. त्याचा मेव्हणा ऋषिकेश शिरगांवकर याने पुढच्या सहा महिन्यात तुझा कार्यक्रम करतो, अशी फेब्रुवारी २०२६ मध्ये धमकी दिली होती. अमित शिंदे हे १४ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईल शॉपीमध्ये असताना महापालिकेत काम करणारा अभिषेक खोमणे हा आला. त्यांना बिल्डिंगमधील पाणी तुंबत असलेली जागा दाखवण्यासाठी मागील बाजूला घेऊन गेला. त्याचवेळी प्रशांत धुमाळ हा त्यांच्याजवळ आला. त्याने ‘तुला माज आला आहे का,’ असे बोलून शिवीगाळ करुन कानाखाली मारली.
त्यावेळी अमित शिंदे यांनी प्रशांत धुमाळ याला एवढी मुले तुझ्यासोबत का आली, असे विचारले. तेव्हा त्यापैकी एका मुलाला उद्देशुन ‘लाव रे भैय्याला व्हिडिओ कॉल’ असे म्हणाला. त्यावेळी प्रशांत व इतरांनी आपल्याकडील कोयते काढून अमितवर वार करण्यास सुरुवात केली. एकाने त्याच्याकडील कोयत्याने अमितच्या डोक्यात वार केला. त्यांच्या हातावर वार केले. प्रशांत व त्याचे साथीदार हे त्यांना ठार मारण्याच्या इराद्याने आल्याचे लक्षात आल्यावर ते पार्किंगचे गेट ढकलून बाहेर पळून शेजारील बिल्डिंगमध्ये लपून बसले होते.
त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नी ऋतुजा, मेव्हणा ऋषिकेश शिरगांवकर यांच्या सांगण्यावरून प्रशांत धुमाळ व त्याच्या साथीदारांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अमित शिंदे यांनी दिली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ५ पथके स्थापन केली आहेत. प्रशांत धुमाळ याला शुक्रवारी (दि. १७) पहाटे मुंबई येथून अटक करण्यात आली.

























