डेक्कन नदीपात्रात कारवाई
marathinews24.com
पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ (वय ३५, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडी करणारे चोरटे गजाआड – सविस्तर बातमी
मरळ याच्याविरुद्ध डेक्कन, वाकड, देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, हवालदार सचिन गायकवाड, सागर घाडगे हे डेक्कन परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी नदीपात्रात गुंड मरळ थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मरळ याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, गु्न्हे शाखेच्या निरीक्षक सपना देवताळे, उपनिरीक्षक अजय भोसले, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दंडगुले, धनश्री सुपेकर यांनी ही कारवाई केली.






















