आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न
marathinews24.com
पुणे – Ketan Agarwal Murder Case : व्यावसायिक केतन अगरवाल खून प्रकरणाला शनिवारी (१८ जुलै) महिना पूर्ण झाला. नियोजित वधू आणि तिच्या प्रियकराने केतनचा लोहगडावरील दरीत ढकलून खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली. देशभरातील प्रसारमाध्यमांनी या खून प्रकरणाची दखल घेतली. केतन अगरवाल खून प्रकरणात आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऑनलाइन ट्रेडिंग’च्या मोहात शेजाऱ्यांच्या घरात घरफोडी – सविस्तर बातमी
केतन अगरवाल याचा १८ जून रोजी लोहगडावरून दरीत ढकलून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोघे जण सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांनी समाज माध्यमांवर (मर्डर मेथड्स) माहिती शोधल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सिया केतनला घेऊन १४ जूनला लोहगडावर गेली असताना, तिने केतनला दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे तिने चेतनची मदत घेतली, अशी माहिती तपासात मिळाली होती. केतनच्या खूनापूर्वी सिया आणि चेतन हे एका कॅफेमध्ये भेटले होते. तेथे त्यांनी केतनला मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर दोघांनी कोंढव्यातील लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत केतनला कशा पद्धतीने मारायचे, याबाबतचा सराव केला होता.
‘सिया आणि चेतन हे सांकेतिक भाषेत संवाद साधायचे. त्यांनी समाज माध्यमातील संवाद काढून टाकला आहे. हा संवाद पुन्हा मिळवण्यासाठी तांत्रिक तपास करण्यात येत आहे. न्यायवैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे, घटनास्थळाची पुर्नरचना (सीन रिक्रएशन), तसेच अन्य तांत्रिक बाबी विचारात घेऊन केतन अगरवाल खून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाइलची तांत्रिक पडताळणी, मोबाइल संवाद, तसेच अन्य बाबींवर तपासात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. केतन अगरवाल खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात आला आहे,’ अशी माहिती ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
























