दोन फरार दहशतवाद्यांना मुंबई विमानतळ परिसरात अटक
marathinews24.com
पुणे – पुण्यात आयईडी बॉम्ब तयार करण्याची आणि त्याची चाचणी घेण्याचे कारस्थान रचणाऱ्या दोघा फरार दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या बंदीस्त दहशतवादी संघटनेच्या पुणे स्थित स्लीपर मॉड्यूलचे साथीदार होते. मागील दोन वर्षे पासू ते फरार झाले होते. अब्दुल्ला फैज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भागीदारीमध्ये व्यावसायाचे आमिष दाखवले, तरुणाची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे इंडोनेशियातील जकार्तामधून भारतात परतण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा मुंबई विमानतळावर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना थांबवल्यावर एनआयएच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांविरोधात एनआयएच्या विशेष न्यायालयाने यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांच्या माहितीसाठी प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. याप्रकरणात यापूर्वी ८ आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपीनी भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचे आणि देशात इस्लामिक शासन स्थापन करण्याचे कट रचले होते. पुण्याच्या कोंढवा परिसरात त्यांनी भाड्याने घेतलेल्या घरात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत बॉम्ब आयईडीची चाचणीही केली होती.
कोंढवा परिसर होता दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू
अब्दुल्ला फैज शेख याने पुण्याच्या कोंढवा भागात घर भाड्याने घेतले होते. 2022 ते 2023 या कालावधीत येथे आयईडी तयार करण्यासाठी कार्यशाळा घेतली होती. नियंत्रित स्फोटाद्वारे त्यांनी बॉम्बची चाचणीही केली होती. या प्रक्रियेत तल्हा खान आणि अब्दुल्ला शेख दोघेही सक्रीय सहभागी होते.।या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींमध्ये मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बरोडावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन आणि शहनवाज आलम यांचा समावेश आहे. सर्वांविरोधात यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.