शिबिरात विविध आजारांबाबत डॉक्टरांकडून १ हजार ३२३ रुग्णांची तपासणी
marathinews24.com
पुणे – स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भोर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सर्व रोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून १ हजार ३२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आवश्यकतेनुसार २०१ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भीय सेवा देण्यात आली.
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ संपन्न – सविस्तर बातमी
रोगनिदान शिबिरात विविध आजारांचे निदान, तज्ज्ञांकडून तपासणी, उपचार तसेच पुढील उपचाराबाबत मार्गदर्शनाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, सदस्य विक्रम खुटवड, प्रवीण जगदाळे, पंचायत समिती सभापती मनीषा कंक, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, पंचायत समिती उपसभापती विशाल कोंडे, तृप्ती खुटवड, राजेश बोडके, प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट तसेच तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद अहिरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शिबिरादरम्यान अवयवदान पंधरवडा अभियानाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अवयवदानाचे महत्त्व, मृत्यूनंतर अवयवदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते तसेच अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अवयवदानाबाबत उपस्थित नागरिक, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. ‘अवयवदान हा मृत्यूनंतरही जीवन देण्याचा मानवतावादी संकल्प आहे,’ असा संदेश यावेळी देण्यात आला. नागरिकांनी अवयवदानाबाबत पुढाकार घेऊन समाजात व्यापक जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले.





















