ई-चलनाद्वारे कारवाईचे अधिकार पोलिस उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांकडे राहणार
marathinews24.com
पुणे – शहरात वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी दंडात्मक कारवाईत गुंतलेल्या वाहतूक पोलिसांना आता केवळ कोंडी फोडण्याचे काम करावे लागणार आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक शाखेतील अंमलदारांची ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ देण्याचे आदेश दिले आहेत. या काळात अंमलदारांनी प्रामुख्याने वाहतूक नियमन करावे, तर ई-चलनाद्वारे कारवाईचे अधिकार पोलिस उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांकडे राहणार आहेत.
चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दंड वसुलीपेक्षा वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्याला प्राधान्य द्यावे, वाहतूक चौकी प्रभाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील कोंडीची कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच कोंडीच्या ठिकाणी आवश्यक संख्येने अंमलदार नेमावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक कर्मचारी चौकात उपस्थित आहेत की नाही, तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार. कोंडी आढळल्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यास मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाहतूक चौकी प्रभाऱ्यांनी त्यांच्या विभागातील ‘हॉटस्पॉट’ निश्चित करून सिग्नलच्या वेळेचा अभ्यास करावा. सिग्नल सिंक्रोनायझेशन, चौकातील कॉर्नर पार्किंग, रिक्षांची अनधिकृत थांबे आणि कोंडीच्या ठिकाणी वाहनांना थांबण्यास प्रतिबंध करण्यावर भर देण्यात येणार आहे. सिग्नलजवळ लेफ्ट साइड लेन सुरू असल्यास त्या ठिकाणी वाहने उभी राहणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.
ब्लॅक स्पॉटवर विशेष लक्ष
शहरातील प्राणघातक अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून तेथे आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी तसेच अपघातांची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी वाहतूक चौकी प्रभाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
ड्रंक अँड ड्राइव्हवर सीसीटीव्हीची नजर
ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई मात्र सुरू राहणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शक्यतो बॉडी कॅमेऱ्याद्वारे कारवाई करावी, तसेच कारवाईच्या ठिकाणी गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद आहे. मुख्यालयाच्या पथकाकडून ‘डमी डिकॉय’ ठेवूनही कारवाईवर लक्ष ठेवले जाणार आहे.
७ परिमंडळांत रात्री विशेष पथके
रात्रीच्या वेळी ड्रंक अँड ड्राइव्ह वगळता आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सात परिमंडळांत प्रत्येकी दोन अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके दुचाकींवरून प्रवास करत वाहतुकीवर लक्ष ठेवतील. या कालावधीत वाहतूक शाखेतील संबंधित अधिकारी आणि अंमलदारांना गुन्हे शाखेकडून रात्रपाळी लावू नये, असेही आदेशात नमूद आहे.
– वाहतूक विभागातील २०० नवीन अंमलदारांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात येणार.
– प्रतिबंधित वेळेत जड वाहनांचा शहरात प्रवेश होऊ नये, यासाठी त्यांना प्रवेशापूर्वीच थांबविण्याच्या उपाययोजना.
– वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघात कमी करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत हा आदेश.





















