पुण्यात ज्येष्ठ महिलेची ७.४९ लाखांची सायबर फसवणूक; पेन्शन योजनेचे आमिष
marathinews24.com
पुणे – Pune Senior Citizen Pension Fraud : खासगी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ७ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे.
रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला बाणेरमधील पॅनकार्ड रस्ता परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. ११ ऑक्टोबर राेजी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका खासगी बँकेतून बोलत असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेकडून निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येणार अहो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचा तपशील पाठवा, असे चोरट्यांनी सांगितले.
चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील मिळवल्यानंतर मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. बँक खात्याशी मोबाइल क्रमांक जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी बँक खात्यातील ७ लाख ४९ हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात वळविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करत आहेत.




















