साक्षीभावाच्या आधारे जीवनातल्या समस्यांवर यथार्थ उत्तर- अभयकुमार सरदार
marathinews24.com
पुणे – ‘निसर्गातील कार्यक्षमता’ विषयावर अनोखे चित्र प्रदर्शन – साक्षीभाव साध्य झाल्यास कोणतेही विचार, कल्पना, भावना किंवा पूर्वग्रह नाहीत अशी एका शांत, तरल, संवेदनाक्षम अवस्था प्राप्त होते. ही साक्षीभाव अवस्था संपूर्णत: ज्ञान-विज्ञान, कर्म आणि चैतन्याने परिपूर्ण असते. त्यामुळे साक्षीभावाच्या आधारे जीवनातल्या कोणत्याही बिकट समस्येवर यथार्थ उत्तर मिळते त्याचप्रमाणे अपेक्षित कार्यही हातून घडते आणि जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी ठरतो, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग तत्त्वप्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.
‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच; शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – सविस्तर बातमी
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्त्वयोग संस्थेच्या शिवाजीनगर येथील ध्यानमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार, तेजा दिवाण, राजश्री करे, तेजस दशरथ, सुचित्रा पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त ‘निसर्गातील कार्यक्षमता’ या विषयावर अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. निसर्गातील कोणतीही रचना, कार्यप्रणाली अतिशय कार्यक्षम असते. गुरुतत्त्वाने प्रत्येक जीवाला जगण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी काही शारीरिक रचना दिल्या आहेत. या गुणधर्मांचा वापर करून प्राणिमात्र अंत:प्रेरणेने, सहजप्रवृत्तीने जगतात आणि त्यामुळेच ते कार्यक्षम असतात. गुरुतत्त्व हे फक्त मानावापुरते मर्यादित नसून ते सर्व निसर्गाचे मार्गदर्शक तत्त्व आहे, याचा उलगडा या प्रदर्शनातून पहायला मिळला.
गुरुतत्त्वयोगाच्या अभ्यासासाठी आणि त्याच्या साधनेसाठी योग्य वातावरण निर्माण करून देणे आणि हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे गुरुतत्त्वयोग सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेचे ध्येय आहे. ‘गुरुतत्त्वाची शिकवण-साक्षीभावाद्वारे वैयक्तिक कार्यक्षमता’ या विषयावर तेजा दिवाण व सुचित्रा पेंडसे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले तर राजश्री करे, तेजस दशरथ आणि प्रचिती पाध्ये यांनी गुरुतत्त्वाच्या साधनेतून आलेल्या अनुभवांचे कथन केले.