पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या आवृत्तीची गुणवत्ता, प्रेक्षकांची शिस्त आणि अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या यशस्वी आयोजनाचे जागतिक सायकलिंग संघटनेकडून कौतुक; भारतातील सायकलिंग विकास कार्यक्रमांना बळकटी देण्यासाठी मदतीचे यूसीआय कडून आश्वासन
marathinews24.com
लेक गार्डा, इटली /पुणे – जागतिक सायकलिंगची सर्वोच्च संघटना असलेल्या युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) या संघटनेने पुणे ग्रँड टूर (पीजीटी) या स्पर्धेला जगातील चौथी ग्रँड टूर म्हणून विकसित करण्यासाठी आणि पुण्याला जागतिक क्रीडा पर्यटनाचे अग्रगण्य केंद्र म्हणून घडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बस सेवेचे लोकार्पण – सविस्तर बातमी
इटलीतील लेक गार्डा येथे यूसीआय व्यवस्थापन समितीसमोर पुणे ग्रँड टूरच्या आयोजन समितीने केलेल्या विशेष सादरीकरणादरम्यान, जागतिक सायकलिंग नियामक संस्थेने पुणे ग्रँड टूरच्या दर्जाचे कौतुक केले. जगातील सर्वोत्तम सायकल शर्यतींशी तुलना करता येईल अशा दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे यूसीआयने नमूद केले. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेची संकल्पना, नियोजन आणि अंमलबजावणी अवघ्या सहा महिन्यांत करण्यात आल्याबद्दल विशेष प्रशंसा करण्यात आली.
पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेला उपस्थित राहिलेल्या तब्बल २५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी (भारतातील कोणत्याही क्रीडा स्पर्धेसाठीची ही सर्वाधिक उपस्थिती) दाखविलेल्या शिस्तीचे यूसीआयने विशेष दाखल घेतली. एवढ्या अभूतपूर्व गर्दीतही उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था राखल्याबद्दल पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाचेही अभिनंदन देखील युसीआय तर्फे यावेळी करण्यात आले.
युरोपबाहेर भविष्यातील ग्रँड टूर उभारण्याची ही पहिली खरी संधी असल्याचे नमूद करत यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टिएंट यांनी स्पर्धेच्या दीर्घकालीन विकासासाठी संस्थेचे संपूर्ण सहकार्य जाहीर केले. यामध्ये शहरी वाहतूक नियोजनासंबंधी तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच भारतातील तळागाळातील सायकलिंग विकास कार्यक्रमांना बळकटी देण्यासाठी मदतीचाही समावेश आहे. पुणे ग्रँड टूरच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला मान्यता देत यूसीआयने या स्पर्धेच्या विकासासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) सरचिटणीस मनिंदर पाल सिंह आणि बजाज ऑटोचे संचालक अभिनव बिंद्रा यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाला यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टिएंट यांनी इटलीतील लेक गार्डा येथे पीजीटीच्या आयोजनासंबंधी सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित केले होते. या शिष्टमंडळाने जानेवारी २०२६ मध्ये यशस्वीरित्या पार पडलेल्या पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन आणि भविष्यातील आराखडा यूसीआय व्यवस्थापन समितीसमोर सादर केला.
सादरीकरण आणि त्यानंतर झालेल्या चर्चेतील महत्त्वाच्या निष्कर्षांविषयी माहिती देताना जितेंद्र डुडी म्हणाले, “यूसीआय व्यवस्थापन समितीने स्पर्धेच्या गुणवत्ता आणि अंमलबजावणीचे कौतुक केलेच, शिवाय पुणे ग्रँड टूरला यूसीआय २.१ दर्जा देण्यास मान्यता दिली. हा स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच २०२७ मधील स्पर्धा २६ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यासही समितीने संमती दिली आहे. त्यामुळे तीन राष्ट्रीय सुट्ट्यांचा समावेश करता येणार असून अंतिम वेळापत्रक निश्चित करण्याचा अधिकार पुणे जिल्हा प्रशासनाकडेच देण्यात आला आहे.”
(यूसीआय २.१ दर्जा हा क्लास-१ स्टेज रेस प्रकारातील दर्जा असून त्यामध्ये अधिक उच्च दर्जाच्या संघांचा सहभाग असतो. सहभागींपैकी ५० टक्क्यांपर्यंत खेळाडू यूसीआय वर्ल्ड टीम्समधून असू शकतात. याशिवाय अधिक बक्षीस रक्कम, अधिक यूसीआय रँकिंग गुण आणि अधिक कठोर आयोजन निकष यांचाही त्यात समावेश असतो.)
स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीच्या यशस्वी आयोजनामागे शासन, क्रीडा महासंघ आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांची असलेली अनोखी भागीदारी अधोरेखित करत शिष्टमंडळाने यूसीआय व्यवस्थापन समितीसमोर पुणे ग्रँड टूरला जगातील अग्रगण्य सायकलिंग स्पर्धांमध्ये स्थान मिळवून देण्याचा पुण्याचा संकल्प मांडला.
सुमारे ९० मिनिटांच्या सादरीकरणात जितेंद्र डुडी यांनी २०२५ च्या उन्हाळ्यात मांडलेल्या संकल्पनेपासून अवघ्या सहा महिन्यांत यशस्वी आयोजनापर्यंतचा पुणे ग्रँड टूरचा प्रवास उलगडला. त्यांनी १,२०० हून अधिक अभियंते आणि १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या सहभागातून पुणे जिल्ह्यातील ४०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे आंतरराष्ट्रीय यूसीआय निकषांनुसार उन्नतीकरण करण्यात आल्याची माहिती दिली.
पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांसाठी उच्च दर्जाच्या स्पर्धांचा समावेश असलेल्या पुणे ग्रँड टूरला भविष्यात टूर द फ्रान्स, गिरो द’इटालिया आणि वुएल्टा अ एस्पान्या यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी रोड सायकलिंगमधील चौथी ग्रँड टूर बनविण्याचे दीर्घकालीन उद्दिष्टही त्यांनी मांडले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दूरदर्शी नेतृत्व, धोरणात्मक मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ निर्णायक ठरल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी बोलताना मनिंदर पाल सिंह यांनी भारताच्या ट्रॅक सायकलिंगमधील अलीकडील यशाचा पाया अधिक मजबूत करून २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच २०३६ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये पदके जिंकण्यासाठी सक्षम खेळाडू विकास प्रणाली उभारण्याची सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची योजना असल्याचे सांगितले.
अभिनव बिंद्रा यांनी पुणे ग्रँड टूरसाठी तसेच जिल्हाभर तळागाळातील सायकलिंग आणि समुदाय क्रीडा विकासाला चालना देण्याच्या व्यापक उद्दिष्टासाठी बजाज ऑटोची दीर्घकालीन बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
यूसीआयने पुणे ग्रँड टूरला युरोपबाहेर भविष्यातील ग्रँड टूर विकसित करण्याची पहिली खरी संधी म्हणून मान्यता दिली आणि या स्पर्धेचे वर्णन खऱ्या अर्थाने “जनतेची शर्यत” असे केले. या सादरीकरणाला जगभरातील वरिष्ठ सायकलिंग प्रशासक उपस्थित होते, ज्यातून पुणे ग्रँड टूरचे वाढते आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित झाले. यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टिएंट यांनी पुढील वर्षीच्या स्पर्धेला स्वतः उपस्थित राहणार असल्याची घोषणाही केली.
जागतिक सायकलिंगच्या सर्वोच्च संघटनेकडून मिळालेला हा भक्कम पाठिंबा पुण्याच्या जागतिक सायकलिंग केंद्र म्हणून होत असलेल्या उदयातील एक महत्त्वाचा टप्पा असून जगातील सर्वात प्रतिष्ठित रोड सायकलिंग स्पर्धांपैकी एक स्पर्धा आयोजित करण्याच्या पुण्याच्या महत्त्वाकांक्षेला नवे बळ देणारा ठरणार आहे.






















