स्वाभिमानी संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
marathinews24.com
पुणे – अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्काराने विक्रम शिंदे सन्मानित – या विशेष पुरस्काराने कोरेगांव तालुक्यातील वेळू गावचे युवा साहित्यिक विक्रम शिंदे यांना गौरवण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान प्रसारक पुरस्कार प्राप्त जेष्ठ प्राध्यापक डॉ. संजय पुजारी, लेखक सत्यवान मंडलिक, आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार उमेश सुतार, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आई-मुलाच्या नात्यावर फुंकर घालणारे ‘पेरले’ गीत रसिकांच्या भेटीला – सविस्तर बातमी
अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्थेचा २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा कराडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. यामध्ये साहित्य, कला, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्यावतीने ” मराठी साहित्य विश्वात अत्यंत कमी वयात भरीव योगदानासाठी हा पुरस्कार विक्रम शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे असून त्यांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांवर आधारीत आजवर शेकडो दर्जेदार ग्रंथांची निर्मिती झाली आहे. त्यांनी ६ पुस्तकांचे लिखाण केले असून अनेक पुस्तकांचे संपादन ही केले आहे. अनेक युवा तरूणांना साहित्य क्षेत्रात यशस्वी कवी लेखक म्हणून घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
महाराष्ट्रभर ४० पेक्षा जास्त प्रकाशन आणि साहित्य संस्था शिंदे यांच्या नव्याने सुरू झाल्या आहेत. यातूनच अनेक युवक साहित्य विश्वात रचनात्मक काम करत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजक म्हणून असणारे त्यांचे बहुमूल्य योगदान, अनेक काव्य कट्टे, परिषदा, चर्चासत्रे, संमेलने तसेच एकंदरीत मराठी साहित्य चळवळीतील त्यांचे योगदान बहुमूल्य असून कवी, लेखक, संपादक ते साहित्य चळवळ नव्याने चालू ठेवणारा एक सर्वसमावेशक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
साहित्य चळवळीतील त्यांच्या व्यापक योगदानाबद्दल या पुरस्काराने विक्रम शिंदे यांना गौरवण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे आणि संयोजक लेखक सत्यवान मंडलिक यांनी दिली.
विक्रम शिंदे म्हणाले “साहित्यिक हा समाजाचा मुख्य कणा आहे. कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या साहित्यिकांनीच आपल्या साहित्यातून मांडाव्यात. अण्णाभाऊ साठेंनी समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना आपल्या साहित्यातून वाचा फोडली होती. अण्णाभाऊ साठेंच्या याच मार्गाने कार्य करत राहीन. तसेच अण्णाभाऊ साठेंना हा पुरस्कार मी अर्पण करतो, असे त्यांनी सांगितले.