लक्ष्मी रोडची ओळख सरस्वतीच्या ज्ञानपरंपरेशीही जोडली जावी – डॉ.श्रीपाल सबनीस; लक्ष्मी रोडवर ज्ञानाचा जागर; ‘वॉव’ भव्य पुस्तक प्रदर्शनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन
marathinews24.com
पुणे – Wow Book Exhibition Pune : पुण्यातील लक्ष्मी रोडची ओळख केवळ व्यापार आणि वैभवापुरती मर्यादित न राहता ती सरस्वतीच्या ज्ञानपरंपरेशीही जोडली जावी. सोन्यापेक्षा ज्ञानाची श्रीमंती मोठी असून, खरी समृद्धी ज्ञानातूनच निर्माण होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. लक्ष्मी रोडवरील जुन्या विजय टॉकीजजवळ असलेल्या ‘वॉव पब्लिशिंग्ज प्रांगणा’त आयोजित ‘वॉव’ भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्याच्या अंगणात विदर्भाच्या भुलाबाई – सविस्तर बातमी
या वेळी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विशाल सोनी, इतिहास संशोधक संदीप तापकिर आणि तेजज्ञान फाउंडेशनच्या प्रेमा भटेवरा उपस्थित होते. लक्ष्मी रोडवर साड्या आणि सोन्याच्या खरेदी-विक्रीला मोठे महत्त्व आहे. याच परिसरात पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्ञानाचा आणि वाचनसंस्कृतीचा जागर घडविणे ही ऐतिहासिक आणि स्वागतार्ह बाब आहे, असे डॉ. सबनीस यांनी नमूद केले. संपत्तीपेक्षा ज्ञानाचे महत्त्व अधिक असून, वाचनामुळे समाजात विवेक, विचारशीलता आणि वैचारिक समृद्धी वाढते, असेही त्यांनी सांगितले.
आध्यात्मिक गुरू सरश्री यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करताना डॉ. सबनीस म्हणाले की, अध्यात्म, मानसिकता, जीवन व्यवस्थापन आणि आत्मविकास या क्षेत्रांत सरश्री यांचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ३०० हून अधिक पुस्तके (Wow Book Exhibition Pune) लिहिली आहेत. मानवाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास साधणे हा त्यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश आहे. सरश्री यांच्या पुस्तकांमधून वाचकांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण बनविण्याची प्रेरणा मिळते.
या प्रदर्शनात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील २० हजारांहून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध आहे. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे. विविध वयोगटांतील वाचक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे प्रदर्शन ज्ञान, मनोरंजन आणि वैचारिक समृद्धीची पर्वणी ठरणार आहे.
‘वॉव’ भव्य पुस्तक प्रदर्शन २२ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यरसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पौराणिक यांनी केले.




















