कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – झटपट श्रीमंत होण्याचे आमिष पडले १५ लाखांना – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास झटपट श्रीमंत होण्याचे तरूणाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्याच्याकडील तब्बल १५ लाख रूपये वर्ग करून घेत सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. ही घटना ६ ते २२ मे कालावधीत कोंढवा खुर्दमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कुटूंबियासह कोंढवा खुर्दमध्ये राहायला आहे. ६ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्याला संपर्क करून एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करून घेतले. त्यानंतर शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे सांगण्यात आले. सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकताच तक्रारदाराने झटपट श्रीमंत होण्यासाठी आपल्याकडील रक्कम गुंतवणूक करण्यास सुरवात केली. अवघ्या १५ दिवसांत १५ लाख रूपये त्याने संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केले. मात्र, त्याला परतावा न मिळाल्यामुळे तरूणाने विचारणा केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचा संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.
श्रीमंतीचा हव्यास पडतोय भारी
शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पुणेकरांना घेरले आहे. अवघ्या काही दिवसांत अमूक-तमूक नफा कमवून देण्याची बतावणी करीत जाळ्यात अडकवले जात आहे. मागील आठवड्यात अशाच प्रकारे शेकडो जणांनी ऑनलाईन लुट करण्यात आली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषपायी अनेकांना आपल्या आयुष्याची पुंजी गमावावी लागत असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पुणे पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, तरीही अनेकजण सायबर चोरट्यांना प्रतिसाद देउन फसवणूकीला सामोरे जात आहेत.
आयपीओमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने १० लाखांचा गंडा
आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ५८ वर्षीय नागरिकाची १० लाख २५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १६ जानेवारी ते ३ मार्च कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करीत तपासाला गती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह वाघोलीत राहायला असून, १६ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांना एका व्हॉटसअॅप गु्रपमध्ये समाविष्ट करून शेअर ट्रेडींगसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास होणारा नफा याविषयी माहिती देण्यात आली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात अडकविले. त्यानुसार अवघ्या अडीच महिन्यांत तक्रारदाराने १० लाख २५ हजारांची ऑनलाईनरित्या गुंंतवणूक केली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क करणे टाळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.