५ जणांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दापाश केला आहे. टोळीकडून तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आणि २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तसेच नोटा छापण्याचे अत्याधुनिक साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करीत शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने मोठे जाळे उध्वस्त केले आहे.
खडी बारीक करण्याच्या मोटारी चोरणार्या कामगाराला अटक – सविस्तर बातमी
कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा झाल्याचे १७ एप्रिलला उघडकीस आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम १७८, १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी मनिषा स्वप्निल ठाणेकर (रा. येरवडा), भारती गवंड (रा. चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (रा. गहुंजे) यांना १८ एप्रिलला ताब्यात घेतले. आरोपींनी चौकशीत बनावट नोटांचा मुख्य पुरवठादार नरेश भिमप्पा शेटटी (रा. लोहगाव) असल्याचे उघड झाले. पथकाने नरेशच्या घरी धाड टाकून २०० रुपयांच्या २० बंडल बनावट नोटा, ५०० रुपयांच्या १११६ ए-४ आकाराच्या कागदांवर २ हजार २३२ बनावट नोटा (मूल्य २२.३२ लाख रुपये), प्रिंटर, शाई, कोरे कागद व इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय नरेशच्या कारमध्ये बनावट २०० रुपयांच्या ६४८ नोटा, ५०० रुपयांच्या ३ नोटा मिळाल्या आहेत. बनावट नोटा बाजारात चालवण्यासाठी टोळक्याने मोठा कट आखल्याचे उघड झाले आहे.
आरोपी प्रभू गुगलजेडडीला यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत एकूण २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा, २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा, बनावट चलन निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलिस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.
व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगा – पुणे पोलीस
नागरिकांनी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांची व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच संशयास्पद नोटा आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट नोटाचा मोठा कट मोडीत उघडकीस आला आहे. यामुळे बाजारातील आर्थिक व्यवहारांवर गडद सावली निर्माण झाली आहे. नागरिकांनी नोटा घेताना बारकाईने तपासणी करावी, अन्यथा मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.