पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – आंतरराज्यीय गांजा तस्करांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, तसेच बारामती शहर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २ कोटी ३९ लाख रुपयांचा ६३४ किलो गांजा जप्त केला. टोळीने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात गांजा विक्री केली आहे. आरोपींकडून गांजासह मोटारी, तसेच अन्य वस्तू असा ३ कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. समाधान धर्मराज गायकवाड, विकी उर्फ पप्पू कांबळे, प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, संग्राम उर्फ चंदन सिंग, जाॅकी माझी, तसेच हुसेन सुखदेव लष्करे, आदित्य विकास शिंदे, युवराज ज्ञानेश्वर दुर्गे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वाघोलीत दुचाकीवरील महिलेचे दागिने चोरण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
‘विक्की कांबळे हा मुख्य सूत्रधार आहे. आराेपी जाॅकी माझी हा मूळचा ओदिशाचा आहे. आरोपी प्रिन्स हा मूळचा बिहारचा आहे. आरोपी माझी याच्या मदतीने कांबळे आणि साथीदारांनी छत्तीसगडमधून गांजा आणला होता. पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात त्यांनी गांजा विक्री केली होती. बारामती परिसरात त्यांनी गांजा साठवून ठेवला होता. आरोपी लष्करे, शिंदे, दुर्गे हे कोथरूड परिसरात राहायला आहेत. आंतरराज्यीय गांजा तस्करी करणारी टोळी पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या गांजा विक्रेत्यांना गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
आरोपी सिंग आणि कांबळे हे दोन मोटारीतून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पंढरपूर-फलटण मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. एक मोटार सांगलीकडे गेली. त्यानंतर याबाबतची माहिती सांगली पोलिसांच्या गु्न्हे शाखेला देण्यात आली. पोलिसांनी सापळा लावून दोन मोटारींना अडविले. आरोपींना अटक केली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, स्वप्नील अहिवळे, नीलेश शिंदे, अजय घुले, रत्नदीप भंडारे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे यांनी ही कारवाई केली. या टोळीने कोणाला गांजा विक्री केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.























