सायबर चोरट्याकडून तरूणाला गंडा
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना अक्षरशः कोडींत पकडले असून, विविध प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या गंडा घातला जात आहे. सातत्याने घडणार्या घटना, तरूण-तरूणींसह महिलांना टारगेट करून सायबर चोरटे ऑनलाईनरित्या संपर्क साधून विश्वास संपादित करीत आहेत. त्यानंतर गुंतवणूकीच्या आमिषाने, गिफ्टची बतावणी, शेअर मार्केटचे जाळे, फसवणूक, फ्रॉड कॉलद्वारे लाखोंचा गंडा घातला जात आहे.
प्रेमप्रकरणातून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत – सविस्तर बातमी
शेअर ट्रेडींग क्रिप्टो करन्सीमध्ये सुरवातीला सायबर चोरट्यांनी नफा देउन तरूणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याला दुसर्या ठिकाणी गुंतवणूकीला भाग पाडून तब्बल ३० लाख ५१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ११ एप्रिल ते ७ मे २०२५ कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरूणाने कोेंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढव्यात राहायला असून, ११ एप्रिल २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाचा संपर्क साधला. त्याच्यासोबत संवाद साधून विश्वास संपादित करीत शेअर मार्वेâटमधील क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर काही प्रमाणात नफा मिळवून दिल्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाला ३० लाख ५१ हजार रूपये गुंतवणूकीला भाग पाडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.
क्रेडीट कार्डसाठी गमावले साडेपाच लाख रुपये
स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला क्रेडीट कार्ड देण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्या व्हॉटसअॅपवर एपीके फाईल पाठवून मोबाइलचा ताबा मिळवून ऑनलाईनरित्या ५ लाख ४९ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २ ते ३ सप्टेंबर २०२५ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहयला असून, २ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या वडिलांसोबत संपर्क साधला. स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी करीत क्रेडीट कार्ड देण्याचा बहाणा केला. त्यानंतर सायबर चोरट्याने संबंधिताच्या व्हॉटसअॅपवर एपीके फाईल पाठवून मोबाइलचा ताबा मिळवला. त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ४९ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.





















