आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – प्रेम प्रकरणातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोरपडे पेठेत घडली. तरुणाला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश अशोक हलवाई (वय २४, रा. घोरपडे पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नाली संतोष तावरे (वय ३२, रा. महाड, जि. रायगड) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका कोमल नीलेश सोनवणे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे आरोपी महिला तावरे हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांमधील प्रेमप्रकरणाची कुणकुण नातेवाईकांना लागल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर आरोपी महिला आणि तरुणाने एकमेकांशी बोलू नये, तसेच यापुढील काळात कोणतेही संबंध ठेवू नये, असे नातेवाईकांच्या बैठकीत ठरले. त्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेच्या त्रासामुळे तरुणाने घोरपडे पेठेतील राहत्या घरात नुकतीच आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन महिलेविरुद्ध तरुणाच्या बहिणीने फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलीस उपनिरीक्षक ताळीकोटे तपास करत आहेत.





















