स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – स्वारगेट परिसरात जिरं मसाला खरेदी करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरहान अख्तर खान, इरफान खान आणि त्यांच्यासोबत असलेल्या चाचा नावाच्या इसमावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण पांडुरंग मेतकुटे (वय ५०, रा. धायरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
कोंढवा परिसरात सव्वा लाखांच्या गांजा जप्त; महिलेसह साथीदाराला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च २०२६ ते दि. ३ एप्रिल २०२६ दरम्यान ओशियन ट्रेडर्स, सेल्सबरी पार्क येथे ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीकडून आधी पाच टन आणि नंतर साडेतीन टन असे एकूण साडेआठ टन जिरं मसाला खरेदी केले. मात्र, त्याचे ठरलेले एकूण १२ लाख ८६ हजार २०३ रुपये न देता आरोपी फरार झाले.
कार वॉश कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पुणे- कार वॉश कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली साडेतीन लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना नांदेड सिटी भागात घडली आहे. ऑनलाइन माध्यमातून हा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी हुरा ऑटो केअर कार वॉश (हुरा टेक्नॉलॉजीज प्रा. लि.) च्या मालक व बँक खातेदार आरोपींवर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साकेत प्रकाश (वय ४२, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २ मार्च २०२५ ते दि. ३१ मे २०२५ दरम्यान ही ऑनलाइन फसवणूक झाली.
आरोपींनी संगनमत करून हुरा ऑटो केअरची फ्रँचायझी देण्याचे खोटे आमिष दाखवले आणि फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून बँक खात्याद्वारे ३ लाख ७५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली.
वारजे भागात ‘वर्क फ्रॉम होम’ टास्कच्या नावाखाली फसवणूक
पुणे-वारजे परिसरात एका तरुणीला टेलिग्रामवर वर्क फ्रॉम होम आणि पार्ट टाईम जॉबची लिंक पाठवून आणि जास्त नफ्याचे आमिष दाखवून ६ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी टेलिग्राम लिंक धारक आणि बँक खातेधारकांवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रगती रेवजी शेळके (वय २५, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १२ मे २०२५ ते दि. १९ मे २०२५ दरम्यान ही ऑनलाइन फसवणूक झाली. फिर्यादीच्या मोबाईलवर पार्ट टाईम जॉबचा मेसेज आला होता. आरोपींनी त्यांना टेलिग्राम लिंकद्वारे काही हॉटेल रिव्ह्यू देण्याचे टास्क दिले. सुरुवातीला नफा देऊन नंतर वेगवेगळ्या खात्यांवर ६ लाख २८ हजार २५९ रुपये भरून घेऊन फसवणूक केली.
मोबाईलवर लिंक पाठवून फसवणूक
पुणे-वारजे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला वन कार्डसाठी अप्लाय केल्याचे सांगून मोबाईलवर फसवणुकीची लिंक पाठवून बँक खात्यातून पावणे चार लाख रुपये उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक व लिंक धारकांवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण नथुमल मालविया (वय ४१, रा. वारजे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २२ मे २०२६ रोजी ही ऑनलाइन फसवणूक झाली. आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर एक बनावट लिंक पाठवली आणि त्याद्वारे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने तसे करताच आरोपींनी त्यांच्या खात्यातून ३ लाख ७० हजार ६५९ रुपये काढून घेतले.






















