शंकरशेठ रस्ता, कात्रजमधील आंबेगाव, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडल्या अपघाताच्या घटना
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकरशेठ रस्ता, कात्रजमधील आंबेगाव, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात अपघाताच्या घटना घडल्या. शंकरसेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात (सेव्हन लव्हज) पीमपी बसवर दुचाकी आदळून सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्राप्पा आशाप्पा गेजे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत नागप्पा बसप्पा धनगर (वय ५१, रा. स्वारगेट पाणी पुरवठा विभाग सेवक वसाहत, स्वारगेट) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मतदार नोंदणी आदेशाचे पालन न करणे महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आरोपी आणि अपघातात मृत्युमुखी पडलेले चंद्राप्पा हे फिर्यादी धनगर यांचे नातेवाईक आहेत. २७ मे रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास दुचाकीस्वार आणि चंद्राप्पा हे शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकी पीएमपी बसवर आदळली. अपघातात चंद्राप्पा गंभीर जखमी झाले. उपचाारदरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक वळसंग तपास करत आहेत.
मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू
कात्रजमधील आंबेगाव परिसरात अपघाताची घटना घडली. श्रीकांत वसंत भातडे (वय ४७, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज) असे मृत्यमुुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत भातडे यांची पत्नी श्रेया (वय ४१) यांनी आंबेगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंबेगाव येथील राजमाता जिजाऊ भुयारी मार्गाजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाजवळ श्रीकांत भातडे झोपले होते. त्या वेळी मोटार मागे घेत असताना चाकाखाली सापडल्याने भातडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन शंकर माळवदकर (वय ५१, रा. गुजरवस्ती, लोणी काळभोर, पुणे-सातारा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत माळवदकर यांचा मुलगा सूरज (वय २५) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन माळवदकर २ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाले होते. कदमवाक वस्ती परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या माळवदकर यांना भरधाव डंपरने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या माळवदकर यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.





















