मालकी हक्क दाखवून वाहने न्या, अन्यथा लिलावात होणार विक्री
marathinews24.com
पुणे – शहरातील वाहतूक विभागाच्या अख्यारित वर्षानुवर्षे पडून असलेली बेवारस वाहने हटविण्याची मोहिम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधितांनी मालकी हक्काची कागदपत्रे दाखवून वाहन नेण्यासाठी प्राधान्य द्यावे. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात वाहने जप्त केली होती. संबंधित ३६५ वाहने मालकांनी कागदपत्रे दाखवून गाड्या घेउन जाण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केल्या आहेत. त्यासोबत समर्थ वाहतूक विभागातंर्गत ५५ बेवारस वाहनेही संबंधितांनी कागदपत्रे सादर करून नेण्याचे आवाहन केले आहे.
आत्महत्याचे धाडस नाही झालं … रेल्वे येताच तो बाजूला झाला अन… मित्राचा जीव गेला – सविस्तर बातमी
बेशिस्तपणे वाहने चालविल्याप्रकरणी अनेकांविरूद्ध वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संबंधितांची वाहने ताब्यात घेत वाहतूक विभागाने कारवाई केली होती. मात्र, वर्षानुवर्षे संबंधित वाहने घेउन जाण्यासाठी मालकांनी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागात बेवारस वाहनांचा ढीग लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित वाहन मालकांनी मालकी हक्क प्रस्थापित करून आपआपली वाहने ताब्यात घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ मध्ये दिलेल्या तरतुदी प्रमाणे कारवाई करुन विनधनी / बेवारस वाहने शासनाच्या स्वाधीन असल्याचे समजून वाहने लिलावाने विकण्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.
वाहतूक विभागाकडे ३६५ वाहने असून, संबंधित वाहन मालकांनी आपला मालकी हक्क सिद्ध करावा. त्यानंतर तातडीने ही वाहने त्यांना देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बिनधनी वाहनात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश असून, उद्घोषणा प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत संबंधिता पोलीस निरीक्षक / सहायक पोलीस निरीक्षकाकडून वाहने समक्ष उपस्थित राहून ताब्यात घ्यावीत. नागरिकांनी अर्जासह मालकी हक्क दर्शविणारी कागदपत्रे सबंधित वाहतुक विभागाच्या प्रभारी अधिकार्यांना सादर करावीत. तसेच समर्थ वाहतुक विभागांर्तगत ५५ वाहने याठिकाणी अटकावून ठेवली आहेत. त्या वाहन मालकांनीही वाहने ताब्यात घेण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
पुणे वाहतूक विभागातंर्गत सध्यस्थितीत ३६५ वाहने पडून आहेत. संबंधित वाहने मूळमालकांना देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, मालकांनी कागदपत्रे दाखवून वाहने ताब्यात घ्यावी. जेणेकरून त्या-त्या वाहतूक विभागातील राडारोडा कमी होण्यास मदत होणार आहे. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा