लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गॅस देयकाची माहिती अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका महिलेची २ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेचा छापा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. गॅस ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्याने गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन महिलेला दहा रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यास सांगितले. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल क्रमांक हॅक केला. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून चोरट्यांनी २ लाख ५४ हजार रुपये काढून घेतले. पोलीस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.
गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. शहरात गॅस, वीज देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक व्यवहारातून महिलेचा खुनाचा प्रयत्न
आर्थिक व्यवहार, तसेच चारित्र्याच्या संशयावरुन एका महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन मांढवे (रा. सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. गीता मुकेश राठोड (वय ४४, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत राठोड हिने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढवे आणि राठोड ओळखीचे आहेत. त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते. आरोपी तिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. ६ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वानवडीतील लष्करी रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगच्या मोकळ्या जागेत आरोपीने राठोड हिच्यवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. वाकडे तपास करत आहेत.






















