उद्योग क्षेत्राला आर्थिक बळ देण्यासाठी बँकांचा संयुक्त पुढाकार

ECLGS 5.0 जनजागृती परिषद पुण्यात संपन्न

marathinews24.com

पुणे – केंद्र शासनाच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 (ECLGS 5.0) या योजनेचा व्यापक प्रसार आणि उद्योग क्षेत्राला सक्षम आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे राज्यस्तरीय विशेष जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली.

लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा रुग्ण हक्क परिषदेतर्फे आज सत्कार सोहळा – सविस्तर बातमी

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (एनसीजीटीसी), ‘जनसमर्थ’ संकेतस्थळ आणि पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र (एसएलबीसी) आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी परिषदेसाठी प्रमुख समन्वयकाची भूमिका बजावली.

परिषदेस महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच प्रमुख खासगी बँकांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि कर्ज विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय एमएसएमई वाणिज्य मंडळ, व्यापारी संघटना आणि विविध बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

यावेळी ECLGS 5.0 योजनेचा लाभ राज्यातील पात्र उद्योग व व्यावसायिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद पद्धतीने पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘जनसमर्थ’ या राष्ट्रीय डिजिटल संकेतस्थळाच्या माध्यमातून कर्ज अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, कागदपत्रविरहित आणि पूर्णपणे संगणकीकृत करण्याबाबत प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.

कर्ज वितरण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी बँकांनी तांत्रिक अडथळे दूर करून रोख प्रवाहाधारित पतमूल्यांकनास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही परिषदेत करण्यात आले. तसेच एनसीजीटीसीकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शंभर टक्के पतहमी संरक्षणाच्या आधारे पात्र उद्योगांना तातडीने आणि विनासंकोच कर्जपुरवठा करण्यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे उद्योग क्षेत्रातील खेळत्या भांडवलाची कमतरता दूर होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

उपस्थित सर्व सरकारी आणि खासगी बँकांच्या प्रतिनिधींनी ECLGS 5.0 योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली. शाखास्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, तसेच किरकोळ कर्ज व एमएसएमई कर्ज प्रक्रिया केंद्रे अधिक सक्रिय करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

वित्तीय सेवा विभागाच्या उपसचिव गरिमा कपूर आणि अवर सचिव शैलेन्द्र कुमार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर मिश्रा, उपमहाप्रबंधक हृषिकेश सावंत, सहसंचालक अभय दफ्तरदार तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक आणि एसएलबीसी महाराष्ट्रचे संयोजक विवेक नाचणे उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

पात्र उद्योजक आणि व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील सरकारी अथवा खासगी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा ‘जनसमर्थ’ संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×