चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौक, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात अपघाताच्या घटना घडल्या. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील गुंजन चित्रपटगृह चौकात सायकलवरुन व्यायामासाठी निघालेल्या ज्येष्ठाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (१० जून) पहाटे घडली. प्रदीप भीमराव यादव (वय ७६, रा. अक्षय बंगला, सैनिकवाडी, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा शंतनू (वय ४६) यांनी लक्ष्मीनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा गुंड गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप यादव हे दररोज सायकलवरुन व्यायामाला जायचे. बुधवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ते नगर रस्त्यावरुन निघाले होते. येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात भरधाव मोटारीने सायकलस्वार यादव यांना धडक दिली. अपघातात ते गंंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसूफ करीम शेख (वय ७०, रा. गांधी चौक, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा वसीम (वय ४५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ शेख हे ३ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या शेख यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (१० जून) सायंकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.























