पुण्यात पीएमपीएल, एसटी प्रवासात दागिने चोरीला
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बससह एसटी प्रवास करणार्या महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी समर्थ आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रामुख्याने मागील काही दिवसांपासून बसप्रवास करणार्या महिलांना लक्ष्य करीत त्यांच्याकडील ऐवज चोरीच्या घटनांचा आलेख वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हडपसरमध्ये घरातून ७ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पीएमपीएल बसने प्रवास करणार्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ९ जूनला सकाळी साडेनउच्या सुमारास रामोशी गेट परिसरात घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिला बसने प्रवास करीत असताना त्यांच्या मागे बसलेल्या महिला चोरट्याने तक्रारदार जेष्ठेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पोलीस अमलदार डमाळे तपास करीत आहेत.
एसटी प्रवासात १० लाख ५५ हजारांचे दागिने चोरीला
एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन दोन चोरट्या महिलांनी ५४ वर्षीय महिलेच्या बॅगेतून तब्बल १० लाख ५५ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना ६ जूनला दुपारी तीनच्या सुमारास मुढा ते मुुंबई सेंट्रल एसटीमध्ये प्रवास करताना नवले ब्रीज परिसरात घडली आहे. याप्रकरणी नवी मुंबईत राहणार्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन महिला चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.




















