गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सराईत गुन्हेगारला केली अटक
marathinews24.com
पुणे – खाद्शनी हरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २७, रा. पंतप्रधान आवास योजना सोसायटी, नांदेड सिटी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेला तस्कर जेरबंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवडे याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात तीन, बंडगार्डन पोलिस ठाण्यात एक आणि फरासखाना पोलिस ठाण्यात एक गुन्ह दाखल आहे. त्याच्याविरोधात चॅप्टर केस, मकोका आणि तडीपारसारख्या गंभीर कारवायाही झालेल्या आहेत. तो सुरज ठोंबरे याचा निकटवर्तीय आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची हद्दपारीची मुदत संपल्यानंतर ते पुन्हा पुण्यात वास्तव्यास होता.
आंदेकर आणि गायकवाड टोळीतील संघर्षानंतर गुन्हे शाखा अलर्ट मोडवर आहे. खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे व धीरज राऊत हे बुधवारी (१० जून) पथकासह गस्तीवर असताना पोलिस अंमलदार अमोल आवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती नांदेड सिटी परिसरात कंबरेला पिस्तूल लावून फिरत आहे. त्यानुसार सापळा रचून आकाश सासवडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत हे पिस्तूल मित्राकडून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
२०१७ मध्ये झाला होता जीवघेणा हल्ला
आकाश सासवडे हा सुरज ठोंबरे टोळीतील सक्रिय साथीदार आहे. २०१७ मध्ये आंदेकर टोळीतील मुनाफ पठाण आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्या घटनेनंतरही त्याचे नाव शहरातील गुन्हेगारी हालचालींमध्ये सातत्याने समोर येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ठोंबरे-गायकवाड टोळीचा वाद अन हल्ले
वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या गुंडांनी ठोंबरे – गायकवाड टोळीतील तिघांवर हल्ले केले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण बचावला आहे. ठोंबरे टोळीतील आकाश सासवडे पिस्तूल आणि काडतुसे घेऊन फिरत असल्याने त्या टोळीने प्रतिहल्लाचे नियोजन केल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






















