पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बीट निरीक्षक रंगेहात जेरबंद
marathinews24.com
पुणे – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथकाचा बीट निरीक्षक उमेश अरुण लोंढे (वय २८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहात पकडले. ही कारवाई ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये करण्यात आली.
अल्पवयीन मुलाकडून वाहनचोरीचे तीन गुन्हे उघड – सविस्तर बातमी
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडे पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागेवर उभारलेले तीन मजली बांधकाम आहे. या बांधकामासाठी महानगरपालिकेची परवानगी न घेतल्याने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित अर्जही करण्यात आला होता.
बीट निरीक्षक उमेश लोंढे यांनी आठ जूनला तक्रारदाराशी संपर्क साधून बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत त्यावर कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत नऊ जूनला एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी ११ जूनला पंचांसमक्ष करण्यात आली. त्यावेळी लोंढे यांनी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून ७० हजार रुपये स्वीकारताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वाकड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाईचे नेतृत्व सहायक पोलिस आयुक्त सतीश वाळके यांनी केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.






















