पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २६ जुलै २०२६ रोजी सकाळी विविध मार्गांवर वाहतूक सुरळीत राहावी, स्पर्धकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोेलनामुळे वाहतूक कोंडी – सविस्तर बातमी
यानुसार २६ जुलै रोजी सकाळी ४ ते दुपारी १२ या कालावधीत पुणे बाजूकडून जेजुरीमार्गे सातारा, फलटण व बारामतीकडे जाणारी वाहतूक संबंधित मार्गांवर पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक सासवड–नारायणपूर–कापूरहोळ, सासवड–वीर फाटा–परिंचे–लोणंद तसेच सासवड–पानवडी–मेमाणे–पिसर्वे–सुपा या पर्यायी मार्गांवरून वळविण्यात येणार आहे.
जेजुरी पोलीस ठाणे हद्दीतील बेलसर फाटा, पारगाव मेमाणे चौक, कोथळे चौक आदी ठिकाणीही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून पुणे, बारामती, केडगाव चौफुला, सातारा व लोणंदकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
सुपा पोलीस ठाणे हद्दीत पुणे–बारामती, बारामती–पुणे, केडगाव चौफुला–सातारा तसेच निरा–सुपा या मार्गांवरील वाहतूकही विविध पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वा. किंवा स्पर्धा संपेपर्यंत मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. स्पर्धेचा मार्ग विराट हॉटेल–खंडोबानगर–कारभारी सर्कल–गुणवडी चौक–इंदापूर चौक–भिगवण चौक–तीन हत्ती चौक असा असून, बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता नटराज नाट्यमंदिर, बारामती येथे होणार आहे.
याकाळात भिगवण, पाटस, पुणे, मोरगाव आणि फलटणकडून येणाऱ्या वाहनांसाठी रिंगरोड, कोर्ट कॉर्नर, देशमुख चौक, रेल्वे पूल, एमआयडीसी मार्ग, मेडिकल कॉलेज मार्ग, कॅनॉल रोड तसेच इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तीन हत्ती चौक ते सम्यक चौक हा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी बंद राहणार असून स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.





















