बाणेरमधील घटना
marathinews24.com
पुणे – दुचाकीवरुन भरधाव निघालेल्या तिघांना जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जीवन मेघावत, देवीदास मेघावत, राेहित मेघावत (तिघे रा. लमाणतांडा, पाषाण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाढत्या गुन्हेगारीने पुणे पोलिसही हतबल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुण पाषाणमधील सुतारवाडी परिसरात राहायला आहे. शनिवारी (१ ऑगस्ट) दुचाकीस्वार तरुण पाषाण परिसरातील शिवशक्ती चौकातून निघाला होता. त्या वेळी आरोपी मेघावत हे दुचाकीवरुन ट्रिपल सीट निघाले होते. तक्रारदार तरुणाच्या दुचाकीला आरोपींच्या दुचाकीने धडक दिली. दुचाकीस्वार तरुणाने आरोपींना जाब विचारला. नीट गाडी चालवा, असे सांगितले. या कारणावरुन आरोपींनी तरुणाला शिवीगाळ केली. एका आरोपीने त्याच्याकडील छोटा चाकू काढला. तरुणाच्या बोटावर चाकूने वार केला. झटापटीत एका आरोपीच्या हातातील कडे तरुणाच्या डोळ्याखाली लागले. तरुणाच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. पसार झालेल्या आरोपींचा शेोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार एन. आर. चोखरे तपास करत आहेत.
























