अमनोरा सोसायटीत खळबळ
marathinews24.com
पुणे – कौटुंबिक वादानंतर तरुणाने १५ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१) मध्यरात्री हडपसरमधील अमनोरा गोल्ड टॉवर येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. राहुल वेदाभ्यास पटेल (वय ३३) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अमनोरा गोल्ड टॉवरमधील १५ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १५०३ मध्ये भाड्याने राहत होता.
पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, तिघांना अटक – सविस्तर बातमी
संबंधित फ्लॅट मृणाल सोनू कुमार यांच्या मालकीचा असून, राहुल हा मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा परिसरातील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. शनिवारी मध्यरात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर राहुलने टोकाचे पाऊल उचलत १५ व्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला.
घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे मृताच्या वडिलांना देण्यात आली असून ते ओडिशाहून पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नेमके कोणत्या कारणामुळे राहुलने हे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत. पत्नीसह कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यात येणार असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
























