फरासखाना पोलिसांकडून गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सायबर फसवणूकीतील रक्कम बँकखात्यात स्वीकारल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातंर्गत विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २१ लाखांचे व्यवहार संबंधित बँकखात्यात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून पुण्यातील विविध बँकखातेधारकांनी स्वतःच्या नावावर असलेली बँकखाती सायबर चोरट्यांना वापरण्यास दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दिल्ली सायबर विभागाने पुणे पोलिसांना पत्र पाठवून संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचे नमूद केले होते.
पुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई – सविस्तर बातमी
हिंदुस्थानातील विविध राज्यांमध्ये सायबर तक्रारींची नोंद झाली असून, त्यातील फसवणूकीची २१ लाखांची रक्कम फरासखाना पोलीस ठाण्यांतर्गत हद्दीतील अनेकांच्या बँकखात्यात वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार संगणमत करून संबंधितांनी बँक खाते सायबर चोरट्यांना व्यवहारासाठी उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महाला तपास करीत आहेत.
शेअरमधील गुंतवणूक पडली ४८ लाखांना
शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना जुलै ते ऑगस्ट २०२५ कालावधीत काळेपडळ परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरूणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, विविध बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.
























