व्यवस्थापकाला अटक, तीन महिलांची सुटका
marathinews24.com
पुणे – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला. कोंढवा परिसरातील मॅजिस्टीक बिझनेस बी. जी. लोणकर रोडवरील ‘रिफ्रेश स्पा सेंटरवर ही कारवाई केली असून, याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक केली. कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली. स्पा सेंटरचा व्यवस्थापक मोनको लोएम (वय ३६, रा. तळेकर कॉलनी, पिंगळे वस्ती, मुंढवा, पुणे; मूळ रा. ट्युएनसांग, सेंट जॉन स्कूल, नागालँड) याला ताब्यात घेण्यात आले. तीन महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मतदार यादी दुरूस्तीची बतावणी, ५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिस अंमलदार अमोल हिरवे यांना रिफ्रेश स्पा सेंटरमध्ये महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून अवैध देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस यांना देण्यात आली. नंतर त्यांनी याची खातरजमा करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी व्यवस्थापक महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रवृत्त करीत होता. त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे.ही कारवाई पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलिस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व पथकाने केली आहे.























