घटनेत एक दात पडला, अन्य दोन दातांना गंभीर दुखापत, तिघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. बहुतांश भागात विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असली, तरी हडपसर परिसरातील ससाणेनगरमध्ये विसर्जन घाटावर धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune Woman Police Assault) गर्दी नियंत्रणासाठी बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस अंमलदाराच्या तोंडावर नारळ फेकून मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिला पोलिस अंमलदाराचा दात पडला असून अन्य दोन दातांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. नीलम गोर्हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
ज्योती प्रदीप सोनवणे (वय ३६) असे जखमी महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी जितेनसिंग जितेंद्रसिंग टाक (वय २१), चिंटूसिंग जितेंद्रसिंग टाक आणि राजवीर दारासिंग बोंड यांच्याविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Woman Police Assault : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती सोनवणे काळेपडळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी त्यांची ससाणेनगर येथील विसर्जन घाटावर बंदोबस्तासाठी नियुक्ती होती. गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक घाटावर जमा झाले होते. यावेळी गर्दी नियंत्रणाचे काम महिला अंमलदार ज्योती सोनवणे करत होत्या. त्याचवेळी आरोपींनी विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांच्या दिशेने दगडफेक तसेच नारळ फेकून मारले. यातील एक नारळ थेट ज्योती यांच्या तोंडावर येऊन आदळला. नारळाचा जोरदार मार लागल्याने त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा एक दात पडला, तर अन्य दोन दातांना गंभीर इजा झाली.






















