महिन्याभरात ११ जणांना चिरडले
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात अवजड वाहन चालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, बेदरकारपणे वाहन चालवून पादचार्यांसह इतर चालकांना हकनाक जीवाशी मुकावे लागत आहे. वाहतूक विभागाने अवजड वाहनासंदर्भात वेळेच्या केलेल्या शिथिल नियमांमुळे संबंधित गाडी मालकाचे चांगलेच फावले आहे. वाहनांवर ना क्लिनर, ना दोन्ही आरसे, ना वेगावर नियंत्रण, ना वहन क्षमतेची मर्यादा, दोन वाहनांमध्ये लागलेली डंपर, कंटेनर चालकांची शर्यत हेच चित्र उपनगरासह मध्यवर्ती भागात दिसून येत आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात महिन्याभरात (सप्टेंबर २०२६) १० जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच मागील ९ महिन्यांत विविध भागात १९५ जणांना बेशिस्त वाहन चालकांनी चिरडले आहे.
स्क्रीन शेअरच्या बहाण्याने क्रेडिट कार्डमधून पैसे काढले – सविस्तर बातमी
पुण्यातील आंबेगाव, बिबवेवाडी, नर्हे, बाणेर, लक्ष्मीनगर, वानवडी, मुंढवा, हडपसर, मांजरी, लोणी-काळभोर,फुरसुंगी, लोणीकंद, वाघोली खराडी या १४ वाहतूक विभागात मोठे अपघात घडले आहेत. मागील महिन्याभरात पादचारी, विद्यार्थी, दुचाकीस्वारांसह मिळून १० जणांना डंपर, कंटेनर चालकांमुळे जीव गमवावा लागला आहे. वाहतूक विभागाचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष असून, उपनगरातील वसुलीबहाद्दर वाहतूक अमलदारांमुळे बेशिस्त वाहन चालकांचे फावले आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्यांना जीवाला मुकावे लागत आहे. दरम्यान, अशाच बेशिस्त प्रकारांमुळे काही महिन्यांपुर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवजड वाहनांना मध्यवर्ती भागासह उपनगरात निर्बंध घातले होते.
बेदरकारपणाने वाहन दामटणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत डंपर, कंटेनर सुसाट सुटले आहेत. त्यामुळे पादचार्यांसह इतर वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. जोरजोरात रेस करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, रस्त्याच्या मधोमध वाहन चालवणे, अंगावर वाहन घातल्यासारखी भीती दाखवून पादचार्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न संबंधित अवजड वाहन चालक करीत आहेत. बेशिस्त वाहन चालकांमुळे पुण्यात ९ महिन्यांत तब्बल १९५ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश असून, त्याखालोखाल दुचाकीस्वार, विद्यार्थी, नोकरदारांसह पादचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे बेफिकीर असलेल्या अवजड वाहन चालकांविरूद्ध कारवाईची मागणी केली जात आहे.
पुण्यात ९ महिन्यांत विविध भागात रस्ते अपघात तब्बल १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्रामुख्याने अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ३४ ब्लॅकस्पॉटवर घडलेल्या अपघातात सर्वसामान्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, वाहतूक विभागाकडून वारंवार जनजागृती करूनही अवजड वाहन चालकांसह बेशिस्तांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्षात मात्र, वाहन चालकांकडून नियमांना तिलांजली दिली जात असल्यामुळे सर्वसामान्यांना जीवाला मुकावे लागत आहे.
बेशिस्त वाहन चालकांचा हैदोस, कारवाईची मागणी
शहरालगत वाघोली, लोणीकंद, केसनंद परिसरात अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्याठिकाणावरील राडारोडा, साहित्य वाहतूक करण्यासाठी सर्रासपणे कंटेनर, डंपरचा वापर केला जातो. प्रत्यक्षात मात्र, बहुतांश वाहन चालकांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहतूक विभागाच्या आदेशातील अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. दरम्यान, खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे दररोजची मोठी वर्दळ असून, बेशिस्त अवजड वाहने, सिमेंट मिक्सर, पाण्याचे टँकर, कचरा वेचक गाड्यांसह इतर वाहने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
पुण्यातील महिन्याभरातील अपघात
भरधाव कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा अपघात घडून वडिलांच्या डोळ्यादेखत १६ वर्षीय लेकीचा मृत्यू झाला आहे. तर खाली पडल्यामुळे वडिलांसह दुसरी मुलगी जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (दि.८ सप्टेंबरला)दुपारी एकच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावर कपिलामृत डेअरीजवळ घडला आहे. प्रतिभा नाईक (वय १६) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर वैष्णवी नाईक हिच्यासह तिचे वडील ज्ञानेश्वर नाईक जखमी झाले आहेत.
डंपर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला असून, सहप्रवाशी तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.२१ सप्टेंबरला ) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोहम्मद वाडीतील रहेजा विस्टा टॉवर जवळ घडला आहे. हमजा इब्राहिम सरकार (वय २०) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर केस वसीम खान (वय २०) हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ३० सप्टेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात घडला आहे. नाना जयराम भोसले (वय ७० रा. येरवडा) असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागात घडली. सुभाष माणिक गायकवाड (वय ३५, रा. प्रथमा हाऊसिंग सोसायटी, रामटेकडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.























