बायकोचा छळ करीत आत्महत्येला केले प्रवृत्त
marathinews24.com
पुणे – लग्नानंतरही दुसर्या महिलेसोबत असलेल्या अफेअरची माहिती पत्नीला समजली. त्यामुळे तिने पतीला जाब विचारला. अफेअर थांबवतो, महिलेचा नाद सोडतो, पण व्यवसाय करायचा आहे. तू माहेरहून १० लाख रूपये घेउन ये, अशी मागणी करीत पतीने पत्नीचा छळ केला. त्यामुळे छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १० मे रोजी आंबेगाव पठारमधील अष्टविनायक नगरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात दुचाकीस्वार चोरटे पुन्हा सुसाट, महिलांचे दागिने हिसकावण्याचे सत्र कायम – सविस्तर बातमी
माधुरी विकास कोकणे (वय ३४, रा. अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती विकास बाळासाहेब कोकणे (वय ३७ ) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आशिष आलगट (वय २२, रा. भूम, धाराशिव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी आणि विकास यांचे डिसेंबर २०२३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर माधुरी तिच्या नवर्यासोबत आंबेगाव पठारमध्ये राहत होती. काही महिन्यानंतर तिला पती विकासचे दुसर्या महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिने त्याला विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तिचा छळ करण्यास सुरूवात केली. मी अफेअर थांबवतो, महिलेचा नाद सोडतो, पण मला व्यवसाय करायचा आहे. तू माहेरहून १० लाख रूपये घेउन ये, अशी मागणी करीत पतीने पत्नीचा छळ केला. सततच्या जाचाला कंटाळून माधुरीने १० मे रोजी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत.