साडेपाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट; तीन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध
marathinews24.com
पुणे – Pune Fodder Production Plan : संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याबरोबरच चारा टंचाईग्रस्त जिल्ह्यांनाही मदत करता यावी, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जिल्ह्यात सुमारे २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात आले असून, त्यातून सुमारे ५.५ लाख टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा सुमारे तीन महिने पुरेल इतकाच असल्याने चारा उत्पादन वाढविणे, बियाणे वितरण आणि चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन यावर प्रशासनाने भर दिला आहे.
संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा- अमित पाथरवट – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे नियोजन करण्यात येत आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बियाणे वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत बियाणे प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर तालुकास्तरावरील नियोजनानुसार शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील वैयक्तिक शेती, गटशेती तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या क्षेत्रांमध्ये चारा लागवडीला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील उपलब्ध सिंचन क्षेत्राचा वापर करून चारा उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. (Pune Fodder Production Plan) बियाणे पेरणीपासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यासोबतच मुरघास निर्मितीवरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे चारा उपलब्ध असताना त्याचे योग्य संवर्धन करून पुढील काळातही पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवता येईल.
चारा उत्पादन आणि पशुधनाच्या पोषणाबाबत शेतकरी व पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. एका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात साधारणतः पाच ते दहा गावांचा समावेश असतो. या गावांतील ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेतकरी आणि पशुपालकांच्या सहभागातून मार्गदर्शन करण्यात येईल.
सुका व हिरवा चारा योग्य पद्धतीने साठविणे, मुरघास तयार करणे, चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवणे तसेच जनावरांना आवश्यक खनिजद्रव्ये आणि पूरक पोषण योग्य प्रमाणात देणे, याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. चाऱ्याची गुणवत्ता वाढवून पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादकता टिकविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जिल्ह्यात सुमारे १८.७ लाख पशुधन
जिल्ह्यात दीड वर्षांपेक्षा अधिक वयाचे सुमारे सात लाख २४ हजार ९०० मोठे पशुधन आहे. त्यामध्ये गायी व म्हशींचा समावेश आहे. याशिवाय सुमारे तीन लाख १० हजार ३२५ लहान पशुधन आणि आठ लाख ३५ हजार ५८९ शेळ्या व मेंढ्या आहेत. या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उत्पादनाबरोबरच साठवण, संवर्धन आणि नियोजनबद्ध वापरावर भर देण्यात येत आहे.
चारा टंचाईग्रस्त जिल्ह्यांनाही मदत
पुणे जिल्ह्यातील चारा उत्पादनातून स्थानिक गरज भागविण्याबरोबरच राज्यातील ज्या जिल्ह्यांना चाऱ्याची आवश्यकता असेल, त्यांनाही मागणीनुसार पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राजेश कुमार वासनिक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे चारा नियोजनासाठी समन्वयाने काम करीत आहेत. बियाणे वितरण, लागवड, उत्पादनाची देखरेख आणि चाऱ्याच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. चारा टंचाईचे संभाव्य संकट कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.




















