बिबवेवाडी पोलिसांनी काही तासांत सात अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना घेतले ताब्यात
marathinews24.com
पुणे – बिबवेवाडीत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तुफान तोडफोड करत दहशत माजवल्याची घटना शुक्रवारी (दि.१६) रात्री न्यू पद्मावतीनगरात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत सात अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
गणेश कोळी ( २० रा. न्यू पद्मावती नगर) आणि आविष्कार भालेराव ( २० रा. न्यू पद्मावती नगर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी गणेश याला काही जणांनी न्यू पद्मावती नगर येथे मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी गणेश, अविष्कार आणि इतर अल्पवयीन मुले शुक्रवारी रात्री न्यु पद्मावती नगर येथे कोयता आणि लाकडी दांडके घेऊन गेले होते. तेथे बरीच शोधा शोध करुनही मारहाण करणारे भेटले नाहीत. यामुळे जाताना आरोपींनी रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांची कोयते आणि लाकडी दांडक्याने तोडफोड केली. एक रिक्षा आणि इतर दुचाकी वाहनांचा समावेश होता.
तोडफोडीचा आवाज ऐकून नागरिक घरातून बाहेर पडले. तेव्हा आरोपींनी त्यांना हत्यारांचा धाक दाखवून दहशत माजवली. दरम्यान काही नागरिकांनी मोबाईलमध्ये तोडफोडीचे चित्रीकरण केले. ते व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली होती. घटनास्थळी गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिसांची पथके दाखल झाली होती. बिबवेवाडी पोलिसांनी काही तासातच तांत्रिक तपासाव्दारे आरोपींचा माग काढला. त्यांच्याकडून ३ कोयते जप्त केले आहेत. आरोपींचे कोणतेही पुर्वीचे रेकॉर्ड नाही तसेच ते कोणतेही कामधंदे करत नाहीत. यातील अल्पवयीन मुले १२ ते १७ वयोगटातील आहेत. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक येवले करत आहेत.